भिसेगाव येथील पहिली डॉक्टर म्हणून आरती कडू हिचा सन्मान..
भिसेगाव- कर्जत(सुभाष सोनावणे)आपले स्वप्न साकार करण्यासाठी अथक प्रयत्न केल्यास अंतिम ध्येया पर्यंत नक्कीच पोहोचतो व आपल्या घरच्यांनी केलेल्या सहकार्याला यश मिळते हे भिसेगाव येथील आरती हिने दाखवून देऊन तरुण पिढीला आदर्श ठरली आहे.
कर्जत तालुक्यातील कर्जत नगर परिषद हद्दीतील भिसेगाव येथील सटूआईनगर परिसरातील रहिवाशी लक्ष्मण गोविंद कडू यांची मुलगी कुमारी आरती लक्ष्मण कडू हिने वैद्यकीय क्षेत्रातील अंतिम परीक्षा उत्तीर्ण होऊन ” डॉक्टरकी ” पदवी संपादन केली आहे.
आरतीचे वडील व्यवसायाने ईको रिक्षा चालक आहेत.आई गृहिणी,मोठ्या बहिणीचे लग्न झाले आहे.तर बंधुराज अंकुश कडू हेही रिक्षा चालक आहेत. तिच्या कुटुंबात कोणतीच शैक्षणिक पार्श्वभूमी नसताना व आर्थिक परिस्थिती देखील सक्षम नसताना वैद्यकीय क्षेत्रात जाण्याचा तिचा धाडसी निर्णयाला घरातून पाठबळ मिळाले.परिस्थितिपुढे हार न मानता आरती वैद्यकीय परीक्षेत उत्तीर्ण झाली आहे.
डॉ . आरतीने तिच्या यशाचे श्रेय तिचे शिक्षक वर्ग,आई-वडील,मोठे बंधु अंकुश तसेच त्यांचे मित्र अमोल मानकामे,शरद खराडे,सलीम शेख,राहुल देशमुख आणि अनूप साळवी या सर्वांना जात आहे असे ती आवर्जून सांगत आहे.
डॉक्टर होण्याचं स्वप्न उराशी बाळगलेल्या रिक्षा चालकाच्या मुलीने सोबतीला असलेली जिद्द आणि चिकाटीमुळे परिस्थितीने देखील हात टेकले आहेत .इच्छा शक्ती आणि अथक प्रयत्नाच्या जोरावर तसेच कुठेही परिस्थितिचा बाऊ न करता आरतीने वैद्यकीय परीक्षेत यश संपादन केले आहे.आरतीच्या या यशाबद्दल सर्वच स्तरातून कौतुक केल जात आहे.
भिसेगावातली एक मुलगी डॉक्टर झाली आहे आणि ही या गावातली पहिली डॉक्टर झाली आहे. याबाबत भिसेगावकरांना डॉ. आरतीचा सार्थ अभिमान वाटतो . डॉक्टर आरतीवर तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.