वडगाव मावळ : शहरातील प्रभाग क्रमांक 16 मधील आयुष प्रसाद अपार्टमेंट मध्ये सौ. राणू पंकज बारनावाल हि परप्रांतीय महिला तिच्या कुटुंबासमवेत राहत आहे.चार दिवसांपूर्वी शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत घरातील जीवनावश्यक वस्तूंचे व फर्निचरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. रहिवाशांच्या सतर्कतेमुळे सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.
हि महिला कुटुंबाला हातभार लागावा म्हणून चालवत असलेले घरगुती ब्युटी पार्लर चे साहित्य पूर्णपणे खाक झाले. सदरची माहिती मोरया महिला प्रतिष्ठानच्या संचालिका यांना समजल्यावर लगेचच प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अबोली मयूर ढोरे, चेतना ढोरे, प्रतिक्षा गट, स्वाती चव्हाण, कविता नखाते, चेतना जैन, छाया जाधव, वैशाली जाधव यांनी त्या महिलेच्या घरी जाऊन भेट देत झालेल्या घटनेची माहिती घेतली.
या प्रसंगातून सावरण्यासाठी व या महिलेने स्वताच्या पायावर उभे रहावे या करिता प्रतिष्ठान च्या वतीने रोख 20,000/- रुपयांची आर्थिक मदत सुपूर्त करण्यात आली.या मदतीने महिला व तिच्या कुटुंबांला थोडा आधार नक्कीच मिळेल व ती पुन्हा एकदा तिचा व्यवसाय सुरू करेल असा विश्वास प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अबोली मयुर ढोरे यांनी व्यक्त केला.