तळेगाव दाभाडे : हॅण्ड इन हॅण्ड इंडिया , तळेगाव ( दाभाडे ) व ग्रुपो अंटोलीन यांच्या संयुक्त विद्यमाने ओव्हळे गावातील महिलांना परसबाग तयार करण्यासाठी मोफत भाजीपाला बियाणे वाटप करण्यात आली.
या कार्यक्रमाची सुरुवात गावच्या सरपंच स्नेहा साठे यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आली तर गावातील परसबाग करू इच्छिणाऱ्या अनेक महिलांनी यावेळी सहभाग घेतला . या कार्यक्रमास हॅण्ड इन हॅण्ड इंडिया संस्थेच्या वतीने अनिल पिसाळ व अभिजित अब्दुल यांनी परसबागेचे महत्त्व आणि लागवड करण्याच्या योग्य पद्धतीबद्दल माहिती दिली . मोफत परसबाग भाजीपाला बियाणे वाटप या कार्यक्रमास संस्थेकडून दिलीप पाटीदार , सारिका शिंदे , मोहन सोनावणे , शेखर खराडे , पंढरीनाथ बालगुडे व सोनाली साठे आदी जण उपस्थित होते.
स्वयंपाक घरातील व इतर पाणी वापरून आपल्या परसदारातील जागेचा उपयोग करून आपण स्वत : च भाज्या पिकवायला पाहिजे , या उद्देशाने हा कार्यक्रम घेण्यात आला . परसबागेमुळे सांडपाणी साचून आरोग्याच्या दृष्टिने आपल्यासाठी हानिकारक न ठरता त्या पाण्याचा उपयोग होईल . आपण आपल्या गरजेपुरत्या भाज्यांची लागवड करू शकतो . लहानशा जागेतील लागवडीमुळे कीटक आणि रोग नियंत्रित राहू शकतात . तसेच रासायनिक खते न वापरता देखील लागवड करू शकतो . ही एक सुरक्षित पध्दत आहे . ज्यामुळे पिकविलेल्या भाज्यांमध्ये कोणतेही रासायनिक अंश नसतात व आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल असे मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमात गावातील इच्छुक 50 महिलांना बियाणे वाटप करण्यात आले . यात प्रत्येकी मेथी 23 ग्रॅम , पालक 23 ग्रॅम , कोथिंबीर 25 ग्रॅम , मिरची 2 ग्रॅम , टोमॅटो 2 ग्रॅम , दोडका 2 ग्रॅम , भोपळा 2 ग्रॅम , कारले 2 ग्रॅम , गवार 5 ग्रॅम , वांगे 2 ग्रॅम , वाल 3 ग्रॅम , भेंडी 5 ग्रॅम , गीलका 2 ग्रॅम आणि काकडी 2 ग्रॅम इत्यादी बियाणे प्रत्येक महिलेला वाटप करण्यात आले . या कार्यक्रमास गावातील परसबाग करण्याऱ्या इच्छुक महिलांनी उपस्थिती लावली व हा कार्यक्रम घेतल्याबद्दल संस्थेचे आभार मानले.