पवनानगर(प्रतिनिधी) : पवनानगर येथे भटक्या श्वानाने 6 शालेय विद्यार्थ्यांवर हल्ला केल्याची घटना आज गुरुवार दि .8रोजी सकाळी सातच्या सुमारास घडली .
सदर श्वान हे पिसाळले असल्याची शक्यता असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे . त्यामुळे जिल्हा प्रशासनाने लवकरात लवकर त्याचा शोध घेऊन बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात येत आहे .
मिळालेल्या माहितीनुसार , पवनानगर येथे आज गुरुवार दि .8 रोजी सकाळी सातच्या सुमारास एका भटक्या श्वानाने येथील 11 ते 15 वर्षे वयोगटातील 6 शालेयीन विद्यार्थ्यांवर हल्ला केला . सदर विद्यार्थी हे शाळेत नेण्यासाठी आलेल्या बसमध्ये चढत असताना अचानक या श्वानाने चावा घेतला.
या हल्यात सदर विद्यार्थी हे गंभीररीत्या जखमी झाल्याची माहिती मिळत असून जखमींना ग्रामीण रुग्णालय काले कॉलनी या ठिकाणी दाखल करण्यात आले होते . मात्र जखमा गंभीर असल्याने त्यांना औंध जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे . दरम्यान , या श्वानाने अचानक विद्यार्थ्यांवर हल्ला केल्याने ते पिसाळले असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे . त्यामुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले असून या पिसाळलेल्या श्वानाचा लवकरात लवकर शोध घेऊन त्याचा योग्य बंदोबस्त करावा , अशी मागणी नागरिक करत आहेत.