पवना नगर( प्रतिनिधी ) : कोथुर्णे ग्रामपंचायत सरपंच पदी अबोली अतुल सोनवणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
अबोली सोनवणे ह्या लोणावळा शहराचे माजी उप नगराध्यक्ष, व बौध्द समाजाचे नेते भिमराव जाधव यांची नात तसेच आर पी आय चे माजी संघटक धम्मरक्षित जाधव यांची कन्या तर आर पी आय ( आठवले ) चे कार्यकर्ते अतुल सोनवणे यांच्या पत्नी आहेत. अबोली यांना जन्मताच राजकारणाचा वारसा लाभला असून त्यांचे पती अतुल सोनवणे यांची जिल्ह्यात उत्तम कारकीर्द असल्याने अबोली ह्या कोथुर्णे ग्रामपंचायत सदस्या म्हणून कार्यरत होत्या. माजी सरपंच प्रमोद ज्ञानेश्वर दळवी यांनी आपल्या सरपंच पदाचा राजीनामा दिल्याने सरपंच पदाच्या रिक्त स्थानी अबोली अतुल सोनवणे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.
आज गुरुवार दि.22 रोजी कोथुर्णे ग्रामपंचायत व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले ) व ग्रामस्थ यांच्या वतीने नवनिर्वाचित सरपंच यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कोथुर्णे ग्रामपंचायत सदस्य,पदाधिकारी तसेच मावळ तालुक्यातील नेते मंडळी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत, ढोल ताशाच्या गजरात भांडारा विरहित जंगी मिरवणूक काढण्यात आली.
पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे,आर पी आय जेष्ठ कार्यकर्ते धम्मरक्षित जाधव, लोणावळा शहर महिला अध्यक्ष उषाताई जाधव, माजी तालुकाध्यक्ष नारायण भालेराव, तालुकाध्यक्ष लक्ष्मण भालेराव, युवक जिल्हाध्यक्ष समीर जाधव व त्यांचे सहकारी आणि ग्रामस्थ मोठया संख्येने या सत्कार समारंभास उपस्थित होते.