Thursday, November 14, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडमाजी आमदार सुरेशभाऊ लाड विधानसभेच्या निवडणूक रिंगणात !

माजी आमदार सुरेशभाऊ लाड विधानसभेच्या निवडणूक रिंगणात !

पक्षातील इच्छुक व विरोधकांना राजकीय हादरा…

भिसेगाव- कर्जत ( सुभाष सोनावणे ) कर्जत – खालापूर मतदार संघातून पाच वेळा विधानसभेची निवडणुक लढून तीन वेळा विजयी झालेले कार्यसम्राट माजी आमदार सुरेशभाऊ लाड आता पुन्हा एकदा विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे त्यांनी सांगितल्याने त्यांच्या या विधानाने कर्जत – खालापूर मतदार संघात राजकीय वादळ उठले आहे.त्यामुळे आगामी विधानसभेचे ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार असतील हे नक्की झाले आहे.
सुरेशभाऊ लाड म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असे समीकरण असलेल्या कर्जत – खालापूर मतदार संघात त्यांनी मायेने – आदराने – कर्तृत्वाने प्रत्येक कार्यकर्त्यांना व मतदारांना न्याय दिल्याचे दिसून येत आहे . गेली ४० वर्षे महाराष्ट्राच्या राजकारण व सामाजिक जीवनाबरोबरच रायगड जिल्ह्यातील कर्जत – खालापूर मतदार संघात राजकीय पटलावर आपल्या कार्याची – हजरजबाबीपणा व नेतृत्वाची छाप पाडणारे सुरेशभाऊ लाड हे बहु आयामी असामी येथील मतदारांवर अधिराज्य करताना दिसत आहेत.
दहिवली ते ग्रामीण भागातील कानाकोप-यात वाड्या पाड्यात त्यांचा चाहता वर्ग आजही दिसत असताना याच जोरावर त्यांनी या मतदारसंघात तीनवेळा ” आमदार ” म्हणून विजयाची हॅट्रिक केलेली दिसून येत आहे.त्यांच्या या विजयात ते ” लोकनेते ” असल्याचीच छाप दिसत असून राजकीय क्षेत्रात त्यांचा असलेल्या दबदब्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार साहेबांच्या अत्यंत निकटवर्तीय म्हणून माजी आमदार सुरेशभाऊ लाड यांना मानसन्मान मिळत आहे . तर माजी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार व खासदार सुनील तटकरे यांचे ते जिवलग मित्र आहेत.
बदलत्या राजकीय धोरणांमुळे महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शिवसेना व काँग्रेस पक्षाची महाआघाडी होण्याची शक्यता आहे . त्यामुळे या मतदार संघात आताचे आमदार महेंद्रशेठ थोरवे यांचा पराभव करण्यासाठी येथील आघाडीचे सूत्र बदलण्याची शक्यता असून महाआघाडीची उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडून माजी आमदार सुरेशभाऊ लाड यांना मिळाल्यास त्यांचा विजयी नक्कीच होईल .असा राजकीय तज्ञांचे मत आहे . राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात त्यांच्या तोडीचा उमेदवार नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हास्तरीय नेते भविष्यात महाराष्ट्राची सत्ता हस्तगत करण्यासाठी कुठलीच रिस्क घेणार नसून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुढील उमेदवार माजी आमदार सुरेशभाऊ लाड असून त्यांनी खोपोली येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते रामकृष्ण तावडे यांची भेट घेऊन केलेली घोषणा त्यांच्या पक्षातील इच्छुक व विरोधकांच्या हवशे – गवशे – नवश्या च्या गोटात नक्कीच राजकीय हादरा बसला आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page