लोणावळा (प्रतिनिधी):लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून अवैध गावठी दारू हातभट्टी वर कारवाईचे सत्र सुरूच. वेहेरगाव मावळ हद्दीतील कंजारभटवस्ती येथे झाडाझुडपात सुरु असलेली गावठी दारू भट्टीवर छापा मारत तब्बल 60 हजाराचे कच्चे रसायन नष्ट करण्यात आले आहे.
अभि करण बिरावत (रा. वेहरगाव, ता. मावळ, जि.पुणे) असे हातभट्टी चालविणाऱ्या आरोपीचे नाव असून पोलिसांची चाहूल लागताच तो पसार झाला. या प्रकरणी पोलीस नाईक गणेश तिलकराज होळकर यांनी लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दिली आहे. आरोपी अभि करण बिरावत याच्या विरोधात पोलीस स्टेशन मध्ये गु. रजि.नं.190/2022, महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 65 (फ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार आरोपी अभि करण बिरावत याने कंजारभट वस्ती वेहेरगाव येथील झाडाझुडपात निळ्या रंगाचे सहा प्लास्टिक बॅरलमध्ये दारुसाठी लागणारे 1,200 लिटर कच्चे रसायन तयार करत असताना पोलिसांनी हातभट्टीवर झापा मारला, पोलिसांची चाहूल लागताच आरोपी पसार झाला.
दि. 03 रोजी दुपारी 1:00 वा. च्या सुमारास लोणावळा ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केली.छापा मारत केलेल्या कारवाईत 60,000/- रू किमतीचे निळे रंगाचे प्लास्टीकचे सहा बॅरेल प्रति लिटर 50 रु. प्रमाणे प्रति बॅरेल 200 लिटर दारूसाठी लागणारे गावठी हातभटटीचे कच्चे रसायन मिळून आले. सदर रसायनामधुन सी. ए. सॅम्पलकरीता एक बॉटल काढुन बाकी रसायन जागीच नष्ट करण्यात आले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस नाईक मुंढे करत आहेत.