भिसेगाव- कर्जत ( सुभाष सोनावणे )कर्जत तालुक्यातील भालिवडी ग्रामपंचायतीच्या कार्यालयाला सरपंच – उपसरपंच आणि सदस्यांनी मिळून ग्रामपंचायतीला टाळे ठोकले आहे .हि घटना कर्जत तालुक्यातील राजकीय इतिहासात प्रथमच घडली असून भालिवडी ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका राजश्री कदम यांच्या मनमानी कारभारा विरोधात सरपंच आणि सदस्य आक्रमक झाले असून त्यांचे निलंबन करण्याची मागणी सरपंच दिपक कार्ले यांनी केली आहे. तसे निवेदन त्यांनी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना दिले आहे.
ग्रामसेविका राजश्री कदम यांच्याविरोधात आधी देखील आपण तक्रार केली असून देखील त्यांच्यावर कारवाई झाली नसल्याने अखेर बुधवारी ग्रामपंचायत कमिटीने एकत्र येत ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकले आहे.याबाबतीत सविस्तर वृत्त असे की , २५ जानेवारीला ग्रामसेविका राजश्री कदम यांनी ग्रामपंचायत कार्यालयात आपल्या हातावर ईजा करून घेतली. सरकारी कार्यालयाच्या ठिकाणी त्यांनी वैयक्तिक कारणावरून स्वताला ईजा करून घेतली , याबाबत लगेचच सरपंच यांनी विस्तार अधिकारी यांना याबाबत कळवले होते.
तर दुसऱ्या दिवशी २६ जानेवारीला त्या कार्यालयात झेंडावंदनासाठी उपस्थित राहिल्या नाहीत , त्यामुळे आम्हाला ग्रामसेवक बदलून मिळत नाही तो पर्यंत आम्ही ग्रामपंचायत कार्यालय बंद ठेवू , असा निर्णय संपूर्ण ग्रामपंचायत कमिटीने घेतला आहे . तसेच अशा ग्रामसेवकांचे निलंबन करण्याची मागणी देखील सरपंच दिपक कार्ले यांनी केली आहे. सरपंच, उपसरपंच आणि ९ सदस्यांनी मिळून आपल्या सह्या असलेले निवेदन गटविकास अधिकाऱ्यांना दिले असून ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकले आहे .यावर गटविकास अधिकारी आता काय निर्णय घेतात याकडे कर्जत तालुक्याचे लक्ष लागून आहे.