Saturday, July 27, 2024
HomeपुणेकामशेतLCB पुणे ग्रामीणची कारवाई,, कामशेत हद्दीत 25 कि.ग्रॅम गांजा जप्त....

LCB पुणे ग्रामीणची कारवाई,, कामशेत हद्दीत 25 कि.ग्रॅम गांजा जप्त….

कामशेत दि.20: कामशेत पोलीस स्टेशन हद्दीत गोवित्री व कोलवाडी गाव परिसरात गांजा तस्करी करणाऱ्या वाहनाचा सेनेस्टाईल पाठलाग करून पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने दि. 19 रोजी कारवाई केली आहे.कारवाईत एकास अटक करून 13 लाख 75 हजाराचा मुद्देमाल यावेळी जप्त करण्यात आला आहे.


पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिलेल्या माहितीनुसार एल सि बी चे पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर धोंगडे, सहाय्यक फौजदार राजेंद्र थोरात, प्रकाश वाघमारे, मुकुंद कदम, दत्तात्रय जगताप, पोलीस हवालदार सचिन घाडगे, मुकुंद आयचीत, प्रमोद नवले, पोलीस शिपाई प्राण येवले हे मुंबई पुणे मार्गावर पेट्रोलिंग करत असताना कामशेत गावच्या हद्दीत गोवित्री गावाजवळ असताना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली कि एका चार चाकी वाहनातून गांजाची तस्करी होत आहे.

मिळालेल्या माहितीच्या आधारे एल सि बी च्या पथकाने कामशेत पोलीस स्टेशन चे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक संजय जगताप, सहाय्यक पोलीस निरीक्षक आकाश पवार, पोलीस हवालदार अजय दरेकर यांच्या मदतीने कोलवाडीच्या दिशेने जाणारे वाहन क्र. एम एच 12 जि एच 4173 मारुती सुझुकीची पांढरी विटारा ब्रिझा ही रहदारीचे नियमानकडे दुर्लक्ष करून अगदी वेगाने कोलेवाडीच्या बाजूस जाताना आढळून आली बातमीदाराकडून बातमीद्वारे मिळालेल्या वाहनाच्या वर्णनाप्रमाणे व चालकाच्या संशयास्पद हालचाली लक्षात आल्यास त्या वाहणास पाठलाग करून अडथळा निर्माण करून पकडण्यात आले.

त्या वाहनाची झडती घेतल्यास त्यामध्ये 25 कि. ग्रॅम वजनाचा गांजा मिळून आला त्यावेळी त्या वाहनातील दोन व्यक्तींपैकी वाहन चालक व मालक संजय मोहिते ( रा. गोवित्री, ता. मावळ, जि. पुणे ) हा पळून गेला असता दुसरा व्यक्ती सनील भाऊ केदारी ( रा. कोलवाडी, ता. मावळ, जि. पुणे ) यास अटक करून पुढील कारवाई करीता कामशेत पोलीस स्टेशनच्या स्वाधीन करण्यात आले. त्यासंदर्भात कामशेत पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

सदर कारवाईत 25 कि. ग्रॅम गांजा रुपये 3 लाख 75 हजार किमतीचा,अंदाजे 10 लाख रुपये किमतीची ब्रिझा गाडी असा एकूण 13 लाख 75 हजाराच्या मुद्देमालासह आरोपीस अटक केली असून पुढील तपास प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक संजय जगताप करत आहेत.पळून गेलेला आरोपी संजय मोहिते हा कामशेत पोलीस स्टेशनमधील सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरोधात यापूर्वी दोन गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी दिली आहे.

- Advertisment -

You cannot copy content of this page