लोणावळा : मराठा आरक्षण सर्वेक्षण संदर्भात लोणावळा नगरपरिषदेमध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. मराठा समाज सर्वेक्षणासाठी दोन दिवस वाढवून दिले असून आज 1 फेब्रुवारी व उद्या 2 फेब्रुवारी ला सर्वेक्षण होणार असल्याची माहिती लोणावळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक अशोक साबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगातर्फे मराठा समाजाचे सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक मागासलेपण सर्वेक्षण (मराठा समाजाचे सर्वेक्षण) करण्यात येत आहे.या सर्वेक्षणाचा कालावधी दिनांक 31 जानेवारी 2024 पर्यतचा होता.या कालावधीत लोणावळा नगरपरिषदेणे आठ हजार लोकांचे सर्वेक्षण केले आहे. तसेच जर कोणाचे चूकभूलीने सर्वेक्षण राहिले असेल तर त्यांनी दि.1 फेब्रुवारी व 2 फेब्रुवारी या दोन दिवसांत आपल्या प्रभागातील पर्यवेक्षकांना संपर्क करावा.असे आवाहन मुख्याधिकारी अशोक साबळे यांनी यावेळी केले. तसेच या सर्वेक्षणासाठी नियुक्त करण्यात आलेल्या पर्यवेक्षकांची प्रभाग निहाय नावे व मोबाईल क्र.ची यादी प्रसारित करण्यात आली असून आपापल्या प्रभागात नजरचुकीने कोणाचेही सर्वेक्षण राहिले असल्यास त्या त्या पर्यवेक्षकांशी संपर्क साधावा.