भिसेगाव-कर्जत(सुभाष सोनावणे)
कर्जत तालुक्यातील कोषाणे येथील रेल्वेच्या २५ नंबर गेट जवळ संततधार पडणाऱ्या पावसामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहू लागल्याने २१ जुलै २०२१ रोजी पहाटे ३ च्या दरम्यान रेल्वे रुळाखालील खडी मोठया प्रमाणात वाहून गेली तर मोठे पोल देखील खाली कोसळल्याने रेल्वेचा विजेचा पुरवठा खंडीत झाल्याने गाड्या त्यावरून जाणे बंद झाले होते.
मात्र रेल्वे ओएचई व पीडब्लूआय विभागाने तातडीने काम करून रेल्वे लाईन सुरळीत केली.कर्जत भिवपुरी स्थानकाच्या मध्य असलेल्या कोषाणे येथील रेल्वेचा २५ नंबर गेटजवळ २१ जुलै रोजी रात्री अतिवृष्टी झाल्याने नदी नाल्यातून ओसंडून वाहणाऱ्या जोरदार प्रवाहामुळे रेल्वे पटरीवर असणारी १०० मीटर खडी वाहून जाऊन त्या जागी १० फूट खोल खड्डा पडल्याने शेजारीच असणारे रेल्वे वीज प्रवाहाचे २ पोल खाली कोसळले होते.
त्यामुळे लागलीच तेथील कर्मचारी यांनी रेल्वे प्रशासनास माहिती देऊन रेल्वे गाड्या बंद केल्या होत्या.पहाटे चार वाजल्यापासून काम सुरू होऊन ते दि. २२ जुलै २०२१ रात्री १० वाजेपर्यंत रेल्वेचे ओएचई व पीडब्ल्यूआय खात्याच्या अधिकारी व कामगारांनी मेहनत घेऊन रेल्वे लाईन व्यवस्थित करून गाडी जाण्यास सुरळीत मार्ग केला.तर खोपोली रेल्वे पटरीचे देखील काम युद्ध पातळीवर चालू असून ते काम देखील लवकरच होईल,असे रेल्वे प्रशासनाकडून समजण्यात आले.