Wednesday, October 16, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडकर्जत तालुक्यातील हुतात्म्यांच्या स्मृती जपण्यासाठी सरकारी निधीची कमतरता भासू देणार नाही- आमदार...

कर्जत तालुक्यातील हुतात्म्यांच्या स्मृती जपण्यासाठी सरकारी निधीची कमतरता भासू देणार नाही- आमदार महेंद्रशेठ थोरवे..

भिसेगाव- कर्जत ( सुभाष सोनावणे ) कर्जत तालुक्याला देशाच्या स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास असून देशासाठी ब्रिटिशां विरुद्ध लढताना आपल्या प्राणाची आहुती देणारे हुतात्मा भाई कोतवाल आणि हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील हे आमच्यासाठी सदैव स्फूर्तीस्थान आहेत . या सर्व हुतात्म्यांची माहिती पुढच्या पिढीला देण्यासाठी तसेच क्रांतिकारक आणि हुतात्मे यांच्या स्मृती जपणारा हुतात्मा चौक परिसर आदर्श बनवण्याचे काम करण्याकरिता सरकारी निधीची कोणतीही कमतरता भासणार नाही असे प्रांजळ मत कर्जत – खालापूर मतदार संघाचे आमदार महेंद्रशेठ थोरवे यांनी सिद्धगड बलिदान दिनाच्या २ जानेवारी २०२३ रोजी आयोजित केलेल्या कार्यक्रमात नेरळ येथे व्यक्त केले.
हुतात्मा स्मारक समिती आयोजित २ जानेवारी १९४७ सिद्धगड बलिदान दिन नेरळ येथे हुतात्मा चौकात हुतात्मा भाई कोतवाल आणि हिराजी पाटील यांच्या बलिदान दिनानिमित्त अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी हुतात्मा भाई कोतवाल यांच्या अर्धाकृती स्मारकास आमदार महेंद्रशेठ थोरवे तर हुतात्मा हिराजी पाटील यांच्या अर्धाकृती स्मारकास ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. तर रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेशदादा टोकरे , नेरळ पोलीस निरीक्षक राजेंद्र तेंडुलकर , श्री साई ट्रस्ट संचालिका राधिका घुले , नावाजलेले कृषीरत्न शेतकरी शेखर भडसावळे आणि जिल्हा परिषदेचे माजी सभापती रामचंद्र ब्रम्हांडे यांच्या हस्ते क्रांतीज्योत प्रज्वलित करण्यात आली.सदरच्या कार्यक्रमात जेष्ठ कवी अरुण म्हात्रे आणि आदिवासी ग्रामीण भागात समाजसेवेचे कार्य करणाऱ्या नवी मुंबई येथील श्री साई ट्रस्ट पदाधिकारी यांना हुतात्मा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी ग्रामपंचायतीच्या सदस्य जयश्री मानकामे , श्रद्धा कराळे , गीतांजली देशमुख , संतोष शिंगाडे आदी त्याचप्रमाणे अनेक मान्यवर उपस्थित होते . यावेळी कार्यक्रमास उपस्थित पाहुण्यांचे स्वागत तुळशीचे रूप देऊन जेष्ठ पत्रकार विजयभाऊ मांडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले . यावेळी कर्जत तालुक्यातील स्वातंत्र सैनिक , नेरळ परिसरातील नागरिक , विद्यार्थी , पत्रकार व अनेक महिलावर्ग राजकीय – सामाजिक – शैक्षणिक क्षेत्रातील पदाधिकारी उपस्थित होते.
- Advertisment -

You cannot copy content of this page