कामशेत (प्रतिनिधी): कोथुर्णे , कडधे , पाथरगाव , नाणे येथील गावठी दारू भट्ट्यांवर कामशेत पोलिसांनी छापा मारत 36 हजार रुपये किमतीची 850 लीटर दारू जप्त केली आहे . आमदार सुनील शेळके यांच्या आंदोलनानंतर कामशेत पोलिसांनी धडक कारवाईचा सपाटा लावत काल रविवारी ही कारवाई केली . या कारवाईत पोलिसांनी एकूण 5 जणांना ताब्यात घेत अटक केली आहे . तर 2 आरोपी पसार झाले आहेत .
त्यानुसार कोथुर्णे येथील कारवाईत महेंद्र सजन बिरावत व सलिप्ता थारा बिरावत ( दोघे रा . कोथुर्णे , ता . मावळ , जि . पुणे ),कडधे येथील कारवाईत परशुराम संतोष राठोड , पार्वती परशुराम राठोड ( दोघे रा . कडधे , ता . मावळ , जि . पुणे ) , तर पाथरगाव कारवाईत देवीदास रमेश नानावत , साहील रमेश नानावत ( दोघे रा . पाथरगाव , ता . मावळ , जि . पुणे ) आणि नाणे येथील कारवाईत सनी बाळू चव्हाण ( रा . नाणे , ता . मावळ , जि . पुणे ) यांना अटक करण्यात आली आहे .
कामशेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , कोथुर्णे गावच्या हद्दीतील कोथुर्णे – मळवंडी ठुले रोडला विशाल ढोले यांच्या विटभट्टीसमोर वर नमूद आरोपी शरीरास हानिकारक असलेली बेकायदेशीर गावठी दारू तयार करून विक्री करत होते . त्यानुसार या ठिकाणी छापा मारत पोलिसांनी 3 हजार रुपये किमतीची 50 लिटर विषारी गावठी दारू जप्त करत दोघांना अटक केली.
तर कडधे गावच्या हद्दीतील कडधे पवनानगर रोडच्या उजव्या बाजूला वर नमूद आरोपी आपल्या राहत्या घरासमोर शरीरास हानिकारक असलेली बेकायदेशीर गावठी दारू तयार करून विक्री करत होते. त्यानुसार या ठिकाणी छापा मारत पोलिसांनी 2 हजार रुपये किमतीची 40 लिटर विषारी गावठी हातभट्टी दारू जप्त करत दोघांना अटक केली.
तसेच पाथरगाव गावच्या हद्दीतील कंजारभट वस्तीच्या जवळ असलेल्या मोकळ्या जागेत वर नमूद आरोपी बेकायदेशीर गावठी दारू तयार करून विक्री करत होते . त्यानुसार या ठिकाणी छापा मारत पोलिसांनी 28 हजार रुपये किमतीची 700 लिटर विषारी गावठी हातभट्टी दारू जप्त केली . मात्र पोलिसांची चाहूल लागताच आरोपी पसार झाले.
त्याचबरोबर नाणे गावच्या हद्दीत नाणे ते नाणोली रोडलगत राहत्या घराच्या पाठीमागे वर नमूद आरोपी बेकायदेशीर गावठी दारू तयार करून विक्री करत होता . त्यानुसार या ठिकाणी छापा मारत पोलिसांनी 3 हजार रुपये किमतीची 60 लिटर विषारी गावठी दारू जप्त करत एकाला अटक केली . पुढील तपास कामशेत पोलीस करत आहेत.