कार्ला- लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या लोणावळ्या जवळील कार्ला वेहरगाव येथील कुलस्वामिनी श्री आई एकविरा देवीची आज सोमवारी (दि .१९ ) चैत्र सप्तमीला होणारी यात्रा प्रशासनाच्या वतीने रद्द करण्यात आली होती परंतू धार्मिक परंपरे रिती रिवाजाने पहाटे आरती अभिषेक तर सायंकाळी सात वाजता धार्मिक परंपरे नुसार पालखी काढत मंदिर परिसरात फिरवण्यात आली.
यावेळी देवस्थान कर्मचारी,देवस्थान पुजारी,गुरव प्रतिनीधी यांच्याहस्ते आरती करुन देवीचा मुखवटा पालखीत ठेवण्यात येऊन मंदिर परिसरात पालखी फिरवण्यात आली. महाराष्ट्रातील तमाम कोळी आग्री समाजाची कुलस्वामिनी व मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे कुलदैवत असलेल्या श्री आई एकविरा देवीची यात्रा दरवर्षी कार्ला गडावर लाखो भाविकांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत असते.
तसेच षष्टीच्या दिवशी देवघर या माहेरघरात देवीचा भाऊ काळभैरवनाथाचा भव्य पालखी मिरवणूक सोहळा तसेच सप्तमीला कार्ला येथे सायंकाळी सात वाजता वाद्यांच्या गजरात देवीचा मानाचा पालखी मिरवणूक सोहळा व अष्टमीच्या पहाटे देवीचे तेलवन व मानाचा सोहळा पार पडतो. देवीचे हे तीन दिवस चालणारा सोहळ्याला किमान पाच ते सहा लाख भाविक दरवर्षी एकविरादेवी दर्शनासाठी येत असतात.
परंतू सलग दुसऱ्या वर्षी मात्र कोरोना विषाणुजन्य आजाराचे संकट सर्व देशवासीयांच्या डोक्यावर थैमान घालत असल्याने भाविकांच्या आरोग्याचा विचार करता मंदिर बंद असल्याने गडावर गर्दी न करण्याचे आवाहन प्रशासनाने केले असल्याने यावेळी देवस्थानचे कर्मचा-यांच्या व गुरव व पुजारी प्रतिनीधी उपस्थितीत पालखी सोहळा संपन्न झाला.
या पालखी सोहळ्या दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी लोणावळा उपविभागीय अधिकारी नवनीत कावत,लोणावळा ग्रामीणचे पोलिस निरिक्षक टी वाय मुजावर,सहायक निरिक्षक अनिल लवटे,निलेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.