Sunday, June 22, 2025
Homeपुणेलोणावळाकैवल्यधाममध्ये ‘हरित योग उत्सव’ संपन्न..

कैवल्यधाममध्ये ‘हरित योग उत्सव’ संपन्न..

५५० पेक्षा अधिक नागरिकांचा सहभाग; वृक्षारोपण व योग साधनेचा संगम.

प्रतिनिधी : श्रावणी कामत.

लोणावळा : आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने आयुष मंत्रालयाच्या “एक पेड माँ के नाम” या उपक्रमांतर्गत कैवल्यधाम योग संस्था आणि कैवल्य विद्या निकेतन शाळेत ‘हरित योग देशव्यापी उत्सव’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शनिवारी (२१ जून) सकाळी ११ वाजता आयोजित या कार्यक्रमात योग साधनेसह वृक्षारोपणाचा उपक्रम पार पडला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन शाळेच्या शिक्षिका सोनाली जाधव यांनी केले. प्रारंभी वरिष्ठ योग शिक्षक नीरज सिंग यांनी उपस्थितांना योगाभ्यासाचे महत्त्व सांगत साधनेसाठी मार्गदर्शन केले. यावेळी शिक्षिका इंदिरा पुरोहित यांनी आपल्या कवितांमधून वृक्षारोपणाचे महत्त्व अधोरेखित करत श्रोत्यांना प्रेरणा दिली.

कैवल्यधामचे मानद सचिव आणि सीईओ श्री. सुबोध तिवारी यांनी ११ व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या तसेच ‘एक पेड माँ के नाम’ या संकल्पनेमागील उद्देश विशद केला.

कार्यक्रमानंतर कैवल्य विद्या निकेतन शाळेच्या आवारात वृक्षारोपणाचा उपक्रम राबवण्यात आला. या वेळी वनपरिमंडळ अधिकारी सागर चुटके यांनी विशेष उपस्थिती दर्शवून सहभाग घेतला.

या हरित योग उत्सवात कैवल्यधाम संस्थेचे अधिकारी व कर्मचारी, शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, तसेच कैवल्यधाम परिवारातील सदस्य अशा एकूण ५५० हून अधिक नागरिकांनी सहभाग नोंदवला.

कार्यक्रमाच्या समाप्तीनंतर सर्व सहभागी नागरिकांनी आपले अभिप्राय लेखी स्वरूपात मांडले.

- Advertisment -

You cannot copy content of this page