Thursday, July 3, 2025
Homeपुणेलोणावळाटपरी धारकांवरील अतिक्रमण कारवाई विरोधात लोणावळा नगरपरिषदेवर धडक मोर्चा...

टपरी धारकांवरील अतिक्रमण कारवाई विरोधात लोणावळा नगरपरिषदेवर धडक मोर्चा…

लोणावळा : लोणावळा शहरातील टपरी , हातगाडी व पथारी धारकांनी आज लोणावळा नगरपरिषदेवर धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी लोणावळा नगरपरिषद प्रशासन व सिटीझन फोरमच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर लोणावळा नगरपरिषदेने मा.उच्च न्यायालयाने गठीत केलेल्या समितीच्या आदेशान्वये सुरु केलेली अतिक्रमण कारवाई थांबवावी अशी मागणी या आंदोलनकर्त्यांनी केली.
लोणावळा बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे व अनाधिकृत बांधकामे असताना त्याकडे कानाडोळा करत प्रत्येक वेळेस केवळ गोल्ड व्हॅली भागातील टपऱ्यांवर प्रशासन कारवाई करत असल्याचा आरोप यावेळी शादान चौधरी यांनी केला . त्या म्हणाल्या , लोणावळ्यात जागोजागी मोठया लोकांची बांधकामे अनाधिकृतपणे उभी रहात असताना त्यांच्यावर प्रशासन कारवाई करत नाही .मग कोणाच्या तक्रारींवरून ह्या कारवाया केल्या जातात ते स्पष्ट करावे असेही त्या म्हणाल्या.
त्याचबरोबर जीवन गायकवाड म्हणाले की लोणावळा शहर व खंडाळा भागातील नागरिक हायवे च्या बाजुने टपऱ्या हातगाड्या लावून व्यावसाय करतात , एमएसआरडीसी व आयआरबी चे अधिकारी सतत त्यांच्यावर कारवाया करत नुकसान करतात. लोणावळ्यात उद्योग व्यावसायाच्या सुविधा नसल्याने अनेक तरुण रस्त्यावर टपऱ्या लावतात , लोणावळा नगरपरिषदेने त्यांना एक आकाराच्या टपऱ्या करून द्याव्यात.तसेच लोणावळा शहरात पुर्वीपासूनचे 350 नोंदणीकृत फेरीवाले आहेत. या पैकी काही जणांना लकी ड्रॉ पद्धतीने जागा दिल्या आहेत . मात्र काही जण अद्याप जागेच्या प्रतिक्षेत आहेत.
त्या सर्वांना बाजारभागात जागा मिळावी ही आमची मागणी असल्याचे टपरी , पथारी , हातगाडी पंचायतचे लोणावळा शहराध्यक्ष वसंत काळोखे यांनी सांगितले.व शहरात वाहतूककोंडी होणार नाही अशा ठिकाणी नोंदणीकृत फेरीवाल्यांना नगरपरिषदेने जागा द्याव्यात . जे नव्याने टपऱ्या , हातगाड्या , पथाऱ्या लावत आहेत , त्यांच्यामुळे नोंदणीकृत फेरीवाल्यांवर देखील कारवाईचा बडगा उगारला जात आहे . ज्या फेरीवाल्यांना आपल्याला न्याय मिळावा असे वाटत असेल त्यांनी संघटनेने सांगितल्यानंतर उपस्थित राहणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
मोर्चेकरांबरोबर मुख्याधिकारी पंडित पाटील बोलताना म्हणाले , गणेशोत्सव काळात 6 सप्टेंबर पर्यतच ही कारवाई स्थगित केली जाणार आहे. व त्यानंतर सर्वपक्षीय पदाधिकारी व टपरी , हातगाडी , पथारी धारकांची संयुक्त बैठक घेऊन पुढील निर्णय घेऊ असे त्यांनी सांगितले . सदर मोर्चात शहरातून शिवसेना , राष्ट्रवादी व मनसेचे पदाधिकारी मोठया प्रमाणात सहभागी झाले होते.
- Advertisment -

You cannot copy content of this page