लोणावळा : नगरपरिषदेच्या माध्यमातून 31 मार्चपूर्वी लोणावळा शहरातील मालमत्ता कर वसुली व पाणीपट्टी कर वसुली करण्यासाठी विशेष मोहिमा व विशेष पथके नियुक्त करण्यात आली आहेत. 31 मार्चपर्यंत शनिवार रविवार व सर्व सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवसात देखील कर भरणा करण्यासाठी कार्यालय खुले ठेवण्यात आले आहे.
असे असताना देखील काही आस्थापना धारकांकडून कर भरणा केला जात नसल्याने त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मोहीम आखण्यात आली असून आतापर्यंत सहा ठिकाणच्या मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच एका हॉटेलच्या चार खोल्यांना सील करण्यात आले आहे.
मा. जिल्हाधिकारी, पुणे यांनी कर वसूली संदर्भात आढावा घेतला. त्यामध्ये लोणावळा नगरपरिषदेच्या करवसुली संदर्भात मोठी नाराजी व्यक्त केली व कर वसूलीचे काम अत्यंत तीव्रपणे मोहीम स्वरुपात हाती घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.
लोणावळा नगरपरिषदेकडून कर वसूलीसाठी पथकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तसेच आज अखेर नगरपरिषद हद्दीतील एकूण 6 मिळकतींवर कर न भरल्याबद्दल जप्तीची कारवाई करण्यात आलेली आहे. तसेच पॅनकार्ड क्लब हॉटेलच्या 4 रूमवर जप्तीची कारवाई करण्यात आलेली आहे.
जे मालमत्ता धारक नगरपरिषदेचा कर थकविणार आहेत, त्यांच्या मालमत्तेला कोणत्याही स्वरुपाचे कसलेही कर्ज मंजूर करण्यात येवू नये यासाठी सर्व राष्ट्रीयकृत बँकांना कळविण्यात येणार आहे. तसेच त्या मालमत्तांचे कसलेही खरेदी विक्री व्यवहार करण्यात येवू नये यासाठी मा. दुय्यम निबंधक लोणावळा यांचे कार्यालयाकडे अशा थकबाकीदारांची यादी सादर करण्यात येणार आहे.
याव्यतिरिक्त जे थकबाकीदार कराचा भरणा नगरपरिषद कार्यालयाकडे करणार नाही त्यांची यादी फ्लेक्स बोर्डवर तयार करुन ती शहरातील मुख्य ठिकाणी लावण्यात येणार आहे.
नगरपरिषदेचा कर भरणे हे प्रत्येक मालमत्ता धारकाचे कर्तव्य असून त्याने आपल्या कर्तव्याचे पालन करणे अपेक्षित व अभिप्रेत आहे. प्रत्येक मालमता धारकाने लवकरात लवकर नगरपरिषदे कडील संपूर्ण कराच्या रक्कमेचा भरणा करुन अप्रिय कारवाई टाळावी असे जाहीर आवाहन नगरपरिषदेकडून सर्व मालमत्ता धारकाना करण्यात येत आहे.
लोणावळा नगरपरिषद हद्दीतील जे मालमत्ताधारक ज्येष्ठ आहेत व त्यांना नगरपरिषद कार्यालयात येवून त्यांच्या कराचा भरणा करणे शक्य होत नाही अशा मालमत्ताधारकांनी नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी श्री. शरद कुलकर्णी यांचे मोबाईल क्रमांक 8805351100 या क्रमांकावर माहिती दयावी.
अशा मालमत्ताधारकांचा कर त्यांचे निवासस्थानी जाऊन भरून घेण्याची व्यवस्था नगरपरिषद कार्यालयाकडून करण्यात येईल.दि.31/03/2024 पर्यंत लोणावळा नगरपरिषदेचे कार्यालय सर्व प्रकारचे करभरणा करीता शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीचे दिवशीही सुरु राहणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी असे आवाहन मुख्याधिकारी तथा प्रशासक अशोक साबळे यांनी केले आहे.