लोणावळा : लोणावळा नगरपरिषदेतील सेवानिवृत्त सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांकडे लोणावळा प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून.वारस हक्कानुसार वारसांना नोकरी नमिळाल्याने नगरपरिषदेच्या आवारात बेमुदत अमरण उपोषण करण्यात येणार असल्याचा इशारा वारसांनी निवेदनामार्फत दिला आहे.
लोणावळा नगरपरिषदेतील सफाई कर्मचारी, रोड स्वीपर म्हणून कार्य करत असताना वयोमानाच्या नियमानुसार सेवा निवृत्त झाल्यास वारस हक्काप्रमाणे त्यांच्या वारसांना लोणावळा नगरपरिषदेत नोकरी मिळने तेवढेच आवश्यक आहे. ह्याकरिता वारंवार नगरपरिषदेशी पत्र व्यवहार करूनही वारसांच्या पदरात निराशाच येत आहे.
नोकरीत सामावून घेण्यासाठी लाड – पात्रे समिती व महाराष्ट्र शासनाच्या न्याय व सहायता विभागाच्या वतीने वेळोवेळी प्रसिद्ध केलेल्या परिपत्रक व जी. आर. नुसार दि.11/4/2018 रोजी मा.आयुक्त तथा संचालक नगरपरिषद संचलनालाय यांना मान्यतेकरिता पाठवलेल्या नगरपरिषदेच्या प्रस्तावास जवळजवळ चार वर्ष झाली असून अद्याप त्या प्रस्तावास मंजुरी मिळाली नाही.त्यामुळे नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या वारसांच्या कुटुंबांची उपासमार होत असून त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
त्याच अनुषंगाने सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे वारस महेश विजय पटेकर, सुनील दगडू ससाणे, मनीषा जीवन सोळंकी, रोहित सुभाष ओझरकर, अब्दुल महंमद शेख, रूपा मनोहर ढोरपालिया, विशाल विलास वाघमारे, वृषाली देविदास बोभाटे, नजमा रशीद शेख इत्यादींच्या वतीने दि.18 रोजी लोणावळा नगरपरिषदेच्या आवारात बेमुदत अमरण उपोषण करणार असल्याचे निवेदन लोणावळा नगरपरिषदेला देण्यात आले आहे.