Monday, January 13, 2025
Homeपुणेलोणावळापर्यटक हे लोणावळ्यासाठी संजीवनीच.... व्यापारी व बेरोजगारांची प्रतिक्रिया..

पर्यटक हे लोणावळ्यासाठी संजीवनीच…. व्यापारी व बेरोजगारांची प्रतिक्रिया..

( मावळप्रतिनिधी )
लोणावळा : लोणावळा शहरातील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेत प्रांत संदेश शिर्के यांनी लोणावळा नगरपरिषदेच्या उपाययोजनांचा आढावा घेत शहरातील सर्व नगरसेवक यांची नुकतीच एक बैठक लोणावळा नगरपरिषदेच्या कार्यालयात घेण्यात आली त्यावेळी लोणावळ्यातील कोरोनाची साखळी तोडण्याकरिता काय उपाययोजना करता येईल ह्यावर चर्चा करण्यात आली.
त्यावेळी प्रांत शिर्के यांनी कोणतेही आदेश येण्यापूर्वी बंगले भाड्याने दिल्यास बंगले मालक व तिथे आलेले ग्राहक यासर्वांवर गुन्हे दाखल करण्याचा महत्वाचा आदेश देण्यात आला आहे.मागील पाच महिन्याच्या लॉकडाऊन कालावधीत लोणावळा खंडाळा व परिसरातील ग्रामीण भागातील सर्व लहान मोठे व्यवसाय ठप्प झाले आहेत. अनेक तरुण बेरोजगार झाले आहेत.
राज्य सरकारने लॉकडाऊन शिथिल करत अनलॉक केले आहे. एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यातील प्रवासाला परवानगी देण्यात आली आहे. आणि इ – पास ही रद्द करण्यात आला आहे. परंतु रेल्वे प्रवास बंद असून लोणावळ्यातील बाहेर काम करणारे अनेक नागरिकांचा रोजगार बुडाला आहे.पर्यटकांच्या गैरहजेरीमुळे शहरातील हॉटेल व्यवसायावरही परिणाम होणार असल्याने इथेही काही रोजगार उपलब्ध होणार अशी शक्यता दिसत नाही. त्यामुळे पुढील परिस्थिती हलाखीची होणार असल्याची चिन्ह दिसत आहेत.
लोणावळा खंडाळा हे पर्यटक ठिकाण असल्यामुळे शासनाकडून प्रवासावरील प्रतिबंध हटविल्यामुळे पर्यटक लोणावळ्याकडे धाव घेत आहेत. पर्यटन स्थळांवरील प्रतिबंध जरी कायम असले तरी लोणावळ्यात आलेले पर्यटक हे खरेदी करण्यासाठी गर्दी करताना दिसत आहेत. त्यामुळे शहरातील अनेक व्यवसाय पूर्व स्तरावर येण्याच्या मार्गांवर असताना प्रांत अधिकारी संदेश शिर्के यांनी लोणावळा शहरातील कोरोना रुग्णांची वाढती लोकसंख्या लक्षात घेत कोरोनाची साखळी तोडण्या हेतू खबरदारी म्हणून हा आदेश दिला आहे.
प्रांत यांनी दिलेल्या आदेशाचे समर्थन करत बंगले भाड्याने देण्यास बंदी करण्यात आल्यामुळे येथील नुकत्याच सुरु झालेल्या व्यवसायांवर याचा दुष्परिणाम होणार असल्याची चर्चा व्यावसायिकांमध्ये व नागरिकांमध्ये सुरु आहे. आज परिसरातील पर्यटन स्थळांवरील प्रतिबंध कायम असून लोणावळ्यात पर्यटकांची राहण्याची सोय नसल्यामुळे इथे पर्यटक येणार नाही हेजरी सद्यस्थिती असली तरी त्यांच्यावर अवलंबून असलेले व्यवसाय मात्र पूर्णपणे ठप्प होऊन उपासमारी ची वेळ येथील व्यावसायिकांवर येणार हे सत्य नाकारता येत नसल्याची खंत नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
शासनाने बंगले भाड्याने देण्यास बंदी घालण्याव्यतिरिक्त सार्वजनिक ठिकाणी, परिसरात, हॉटेलच्या बाहेर व पर्यटक गर्दी करत असलेल्या ठिकाणांवर सूचना फलक आणि पर्यटन बंदी असल्याचे फलक लावून पर्यटकांना मार्गदर्शन करण्यात यावे. लोणावळा खंडाळ्यात आलेल्या पर्यटकांसाठी पर्यटनस्थळे बंद, राहण्याची सोय नाही अशा परिस्थितीत पर्यटक इथे येणार का ? असा प्रश्न नागरिकांमध्ये सध्या चर्चेचा विषय बनला आहे.”अष्ट दिशा” प्रतिनिधींमार्फत पुणे मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील वरसोली टोल नाका, गवळी वाडा नाका, लोणावळा बाजारपेठ व महामार्गावर असलेल्या मॅगी पॉईंट येथील व्यावसायिकांबरोबर करण्यात आलेल्या चर्चेतून ही प्रतिक्रिया समोर आली आहे.
तरी प्रांत अधिकारी यांनी शहरातील व्यवसाय संदर्भातील ह्या सर्व घटकांचा विचार करून निर्णय घेण्यात यावा असे मत येथील दुकान व्यावसायिक, नागरिक, बंगले व्यावसायिक यांनी व्यक्त केले आहे.शासनाचे निर्णय हे आपल्या आरोग्य हितार्थ असून नागरिकांनी कंटेनमेन्ट झोनचे स्वशिस्तीने पालन करावे, आपले अहवाल पॉझिटिव्ह आल्यास शासकीय अधिकाऱ्यास याची कल्पना दयावी, विनाकारण घराबाहेर पडण्याचे टाळावे, बाहेर पडणे गरजेचे असल्यास तोंडाला मास्क लावावे, सोशल डिस्टंसिंगचे पालन करावे यासारख्या शासकीय सूचनांचे काटेकोरपणे पालन करत पोलीस व नगरपरिषदेस सहकार्य करावे. असे आवाहन “अष्ट दिशा ” न्यूज कडून सर्व नागरिकांना करण्यात येत आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page