लोणावळा : मावळ तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्र हादरवून सोडणाऱ्या पवन मावळ कोथूर्णे येथील अल्पवयीन बालिका अपहरण, लैंगिक अत्याचार व निर्घृण हत्या या प्रकरणातील आरोपीला आज शिवाजीनगर पुणे येथील जलद गती न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे तर सदर हत्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी आरोपीला मदत करणारी त्याची आई हिला देखील सात वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
दोन ऑगस्ट 2022 रोजी ही घटना घडली होती. या प्रकरणी कामशेत पोलीस स्टेशनमध्ये आरोपींच्या विरोधामध्ये विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणातील आरोपी तेजस महिपती दळवी (राहणार कोथूर्णे, या. मावळ, जि. पुणे) याला भादवी कलम 376 (AB) व 376 (A) व पॉस्को कलम 6 नुसार फाशी, भादवी कलम 376 (2) खाली जन्मठेप व 10 हजार रुपये दंड, भादवी कलम 302 प्रमाणे फाशी व 10 हजार रुपये दंड, भादवी कलम 363 प्रमाणे सात वर्ष कारावास व 5 हजार रुपये दंड, पॉस्को क 4 नुसार जन्मठेप व 20 हजार रुपये दंड अशी विविध कलमान्वये शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसेच त्याची आई सुजाता महिपती दळवी यांना भादवी कलम 201 खाली सात वर्ष कारावास व 5 हजार रुपये दंडाची शिक्षा देण्यात आली आहे. बी.पी. क्षीरसागर कोर्टात हा खटला चालला तर या केसचे सरकारी वकील म्हणून राजेश कावेडिया यांनी काम पाहिले.