Friday, October 18, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडपोलीस मित्र संघटना व पेण अर्बन बँक संघर्ष समितीचा आक्रोश !

पोलीस मित्र संघटना व पेण अर्बन बँक संघर्ष समितीचा आक्रोश !

आमरण उपोषण – आत्मदहन करूनच लढणार आरपार ची लढाई – रमेश दादा कदम..

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) -” श्री प्रभू रामचंद्राचा ” वनवास १४ वर्षांनी संपला मात्र रायगड जिल्ह्यातील सर्वांच्या जिव्हाळ्याची असलेली पेण अर्बन बँकेच्या ठेवीदार व सभासदांना त्यांच्या आयुष्यभराची कष्टाची पुंजी बुडीत झालेल्या घटनेला ” १४ वर्षे ” पूर्ण होवूनही अद्यापी ” न्याय ” न मिळाल्याने १ लाख ५८ हजार २८० ठेवीदार व सभासदांना ७५० करोड रु. परत मिळवून देण्यासाठी कर्जत शहरात पोलीस मित्र संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष रमेश दादा कदम व पेण अर्बन संघर्ष समिती ” ठिय्या आंदोलन , आमरण उपोषण व आत्मदहन ” असे आरपारच्या आंदोलनास ३० सप्टेंबर २०२४ पासून बसले आहेत . आज या आंदोलनाचा चौथा दिवस आहे.

हे प्रकरण सध्या आर बी आय , इडी , यांच्या कार्यालयात केंद्रात जाऊन पोहचल्याने केंद्रात व राज्यात सत्तेत असलेल्या ” भारतीय जनता पक्षाने ” याचा ” तिढा ” सोडवून न्याय देण्याची गरज असल्याचे मत पोलीस मित्र संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष रमेश दादा कदम यांनी व्यक्त केले आहे . आताची लढाई हि आर पार ची लढाई असून आमचे पैसे परत मिळवणारच , या भूमिकेत पेण अर्बन बँक संघर्ष समिती आहे . तर या सर्वाँना न्याय देण्यासाठी प्रसंगी माझा ” जीव ” गेला तरी चालेल , पण आता मागे हटणार नाही , अशी भूमिका २४ वेळा जनआंदोलन व प्राणांतिक उपोषण करणारे पोलीस मित्र संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष रमेश दादा कदम हे ” आक्रमक ” झाले आहेत.

पोलीस मित्र संघटना व पेण अर्बन बँक संघर्ष समितीच्या आंदोलनातील मागण्या नुसार भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या , पनवेलचे भाजप आमदार प्रशांत ठाकूर , कर्जतचे किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष सुनील गोगटे , यांनी प्रयत्न केले आहेत , मात्र दिल्ली दरबारी वरिष्ठ नेते व मंत्री त्यांच्या या मागणीला कचऱ्याची कुंडी दाखवत आहेत , आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी देखील हि बाब मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब कर्जत येथे ऐतिहासिक वास्तूंच्या लोकार्पण सोहळ्यास आले असता त्यांना सांगितली होती , मात्र त्यांचे अधिकार देखील कमी पडत असल्याने , ” हा तिढा फक्त भारतीय जनता पक्ष म्हणजेच केंद्रातील मोदी सरकारच सोडवू शकतात . असे मत आंदोलन कर्ते यांनी मांडले आहे . जमीन विका , आणि पैसे द्या , केंद्र सरकारला ७५० करोड म्हणजे काहीच रक्कम नसताना , सरकारच्या ताब्यात २ हजार करोड रुपयांच्या जमिनी आहेत मग , हे १४ वर्षे नाहक ” भिजत घोंगडे” का ठेवले आहे ? असा संतप्त सवाल पेण अर्बन बँक संघर्ष समितीने उपस्थित केला आहे . निदान नवीन कायदयाच्या तरतुदीनुसार सर्व ठेविदारांना ५ लाखाचा विमा कवच रक्कम तात्काळ मिळावी , अशी मागणी जोर धरत आहे.

म्हणूनच आता रायगडच्या भारतीय जनता पक्षाने ” पुढाकार ” घेण्याची गरज असून पोलीस मित्र संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष रमेश दादा शांताराम कदम हे देखील भाजप कार्यकर्ते असल्याने विधानसभेच्या निवडणूक पूर्व रायगडच्या नागरिकांसाठी पेण अर्बन बँकेच्या ठेवीदारांना न्याय देण्यासाठी पुकारलेल्या या आंदोलनाची दखल भाजपाने घ्यावी , अशी मागणी त्यांनी केली आहे . त्यामुळे हे आंदोलन कुठल्या दिशेला जाणार , आणि चिघळणार का ? याकडे संपूर्ण रायगडचे लक्ष लागून आहे.

या उपोषण आंदोलन ठिकाणी पोलीस मित्र संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष रमेश दादा कदम , पेण अर्बन बँक संघर्ष समितीचे प्रदिप शहा , मोहन सुर्वे , तसेच मा. नगराध्यक्ष राजेश लाड , राजाभाऊ कोठारी सर् , सुरेश बोराडे , त्याचप्रमाणे व अनेक पदाधिकारी , ठेवीदार , नागरिक , महिला वर्ग उपस्थित होते.
- Advertisment -

You cannot copy content of this page