Tuesday, December 3, 2024
Homeपुणेतळेगावबापूसाहेब भेगडे यांचे सक्षम नेतृत्व लाभल्यास युवकांना रोजगार, महिला सुरक्षा, शिक्षण, पर्यटन...

बापूसाहेब भेगडे यांचे सक्षम नेतृत्व लाभल्यास युवकांना रोजगार, महिला सुरक्षा, शिक्षण, पर्यटन वाढून मावळ समृद्ध होईल : उद्योजक रामदास काकडे..

महिला व तरुणांनी बापूसाहेब भेगडे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचे काकडे यांचे आवाहन..

प्रतिनिधी – श्रावणी कामत.
तळेगाव दाभाडे : शांत, संयमी मावळ वासियांना निसर्गाची अमूल्य देणगी मिळालेली आहे. निसर्गाच्या मुबलक वरदानासोबतच मावळमधील तरुणांच्या हाताला काम, शिक्षण, महिला सुरक्षा, शेतीला मुबलक पाणी, फूल शेतीचे आंतरराष्ट्रीय स्तरावर मार्केटिंग हे महत्वाचे प्रश्न सोडविल्यास मावळची प्रगती होईल. बापूसाहेब भेगडे यांच्या सक्षम नेतृत्वामुळे युवकांना रोजगार, महिला सुरक्षा, शिक्षण, पर्यटनामुळे मावळ होईल संपन्न. त्यासाठी अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांना मावळच्या जनतेने निवडून द्यावे, असे आवाहन उद्योजक रामदास काकडे यांनी केले.

रामदास काकडे यांनी सांगितले, की राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर मावळचे नाव पोहोचले आहे ते इथल्या औद्योगिकीकरणामुळे आणि शेतीत होत असलेल्या वैविध्यपूर्ण प्रयोगांमुळे. तसेच तालुक्याचे वैशिष्ट्य म्हणजे रेल्वे आणि महामार्ग, जवाहरलाल नेहरू पोर्ट, विमानतळ यांची चांगली कनेक्टिव्हिटी असल्याने या तालुक्यात उद्योग, मोठ्या शैक्षणिक संस्थांनी मावळला प्राधान्य दिले आहे. मावळ तालुक्यात अनेक धरणे असल्याने मुबलक पाणी, उत्तम रस्ते, विजेची उपलब्धता, आणि महत्त्वाचे म्हणजे कुशल मनुष्यबळ उपलब्ध असल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित कंपन्यांना मावळने खुणावले आहे. जगभरातील उद्योग मावळ तालुक्यात येण्यास उत्सुक आहेत. जेसीबी, ह्युंदाई, एल अँड टी, कॉन्टीनेंटल यासारख्या कंपन्यांनी मावळमध्ये आपले उद्योग सुरू केले. नवलाख उंबरे, आंबी, मंगरूळ, आंबळे, टाकवे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उद्योग उभारणी झाली आहे.
पवन मावळात उद्योग उभारणी शक्य : पवन मावळ पट्ट्यामधील उर्से, बऊर, करुंज, चांदखेड, परंदवडी या पट्ट्यामध्ये उद्योग उभारणी केल्यास त्याचा मावळ तालुक्याला मोठा फायदा होऊ शकतो.
लोणावळ्यात आयटी उद्योग येऊ शकतो :लोणावळा, पवना, खांडी, कुसुर येथे पर्यटन उभारणीसाठी पोषक वातावरण आहे. लोणावळा हे थंड हवेचे ठिकाण आहेच. शिवाय पर्यटननगरी म्हणूनही प्रसिद्ध आहे. यासोबतच ते मुंबईच्या जवळ असल्याने आयटी उद्योग येथे होऊ यशस्वी होऊ शकतो. त्या दृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे आहे.
देहूरोडचा रेडझोन सोडवणे गरजेचे : देहूमध्ये जगद्गुरू संत तुकाराम महाराज मंदिर असल्याने लाखो पर्यटक देहूला भेट देत असतात. त्यामुळे या परिसरात पर्यटन व्यवसाय वाढण्यास मोठी संधी आहे. देहूरोड येथील रेड झोन सोडवल्यास रहिवाशांवरील कारवाईची टांगती तलवार दूर होऊ शकेल.
बेरोजगारांना नोकरी व्यवसायाची संधी : नियोजनबद्ध काम केल्यास मावळ तालुक्यातील बेरोजगार, तंत्रकुशल युवक युवतींना नोकरी, व्यवसायाच्या संधी निर्माण होतील. महिलांना सुरक्षिततेबरोबरच शिक्षण व कंपन्यांमध्ये हाताला काम मिळेल.
पुणे मेट्रो लोणावळ्यापर्यंत व मावळात आणणे :जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील नित्याची वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आजपर्यंत प्रयत्नच झाले नाहीत. पुणे मेट्रो निगडीपासून पुढे लोणावळ्यापर्यंत आणून, मावळमधील औद्योगिक पट्ट्यात मेट्रो फिरवल्यास मोठी कॉनेक्टिवीटी वाढून एमआयडीसीला मोठा फायदा होऊ शकतो.
फुलशेतीचे आंतरराष्ट्रीय स्तरावर मार्केटिंग केल्यास शेतकरी फायदा :मावळातील इंद्रायणी तांदूळ, तसेच फुल उद्योग यांचे मार्केटिंग करून फुले आणि तांदुळाला आंतरराष्ट्रीय पातळीवर नेल्यास शेतकऱ्यांना मोठा फायदा शक्य आहे. त्यादृष्टीने पावले टाकली पाहिजेत.
मनुष्यबळ वाढविण्यासाठी औद्योगिक अभियांत्रिकी महाविद्यालय आणण्यासाठी प्रयत्न : ग्रामीण व शहरी अशा दोन्ही भागात बेरोजगार तरुण, महिलांसाठी ट्रेनिंग सेंटर उभारण्याची गरज आहे. कुशल मनुष्यबळ वाढविण्यासाठी औद्योगिक अभियांत्रिकी महाविद्यालय आणण्यासाठी प्रयत्न आवश्यक आहे. तसे प्रयत्न झाल्यास मावळातील मोठ्या कंपन्यांना मनुष्यबळ मिळून बेरोजगारी दूर होण्यास मदत होईल. स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून तालुक्यातील तरुण तरुणी शासकीय सेवेत यायला हवीत, यासाठी तालुक्यात अनेक गावात स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करणे गरजेचे आहे.

या सर्व गोष्टींची पूर्तता गेल्या ५ वर्षात होणे अपेक्षित होते. मात्र, तसे न झाल्याने तालुक्यात मोठी बेरोजगारी वाढली आहे. तरुणांच्या हाताला काम आणि महिलांना नोकरी व्यवसायाच्या माध्यमातून सक्षम करण्यासाठी मावळ तालुक्यातील तरुण, महिलांनी सर्वपक्षीय अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून आमदार म्हणून निवडून येण्याची संधी द्यावी, असे आवाहन रामदास काकडे यांनी केले.
- Advertisment -

You cannot copy content of this page