डॉ.बाबासाहेब आंबेडकर – संविधान -बौद्ध समाजाच्या विरोधात आक्षेपार्ह लिखाण व सुस्त पोलीस यंत्रणा याविरोधात संतप्त प्रतिक्रिया…
भिसेगाव- कर्जत (सुभाष सोनावणे) भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी आक्षेपार्ह लिखाण फेसबुकवर केल्याने संतप्त झालेला कर्जत तालुक्यातील बौद्ध समाज , महिला वर्ग , जेष्ठ नागरिक , तरुणवर्ग , विद्यार्थी देखील आज आयोजित केलेल्या कर्जत तहसिल कार्यालयावरील ऐतिहासिक अश्या विराट क्रोध मोर्चास हजर झाले होते. आज दि. २१ सप्टेंबर २०२२ रोजी कर्जत तालुक्यातील बौद्ध समाजाचा विराट क्रोध मोर्चा भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक ते तहसिल कार्यालयावर मोठया संख्येने जयघोषात गेला.
त्यानंतर शिष्टमंडळाने मा.तहसिलदार डॉ.शीतल रसाळ यांना निवेदन देवुन शासनाकडे सबंधित महिलेने महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर व भारतीय संविधानाबददल व बौद्ध समाजाबद्दल आक्षेपार्ह लिखाण पोस्ट फेसबुकवर केली होती.सदर प्रकरणामध्ये पोलिसांनी त्या पोस्टला समर्थन करणा-या आरोपींना अटक केलेली नाही तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती आरक्षण सोडतीत एकही जागेचे आरक्षण बौद्ध समाजासाठी पडले नसल्याने झालेल्या अन्यायाबाबत योग्य ती भुमिका प्रशासनाने न घेतल्यास यापेक्षा तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्यात येईल व प्रसंगी मतदानावर देखील बहिष्कार टाकण्यात येईल , असा इशारा यावेळी देण्यात आला. जिल्ह्यातील सायबर क्राईम सेल जर योग्य तपास अनेक घटनांमध्ये करत नसल्याने या कार्यालयाला टाळे ठोकून बंद करा , असा सल्ला देखील या मोर्चे प्रसंगी देण्यात आला.
तर पोलीस यंत्रणेने देखील या घटनेत बेजबाबदार पणाची भूमिका घेतल्याने अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. यावेळी कर्जत वरिष्ठ पोलीस निरीक्षक के.डी. कोल्हे यांनी मोठ्या संख्येने चोख बंदोबस्त ठेवला होता. सदर मोर्चास कर्जत तालुक्यातील सर्व पक्ष, संस्था, संघटना तसेच बौद्ध महिला, पुरुष, विद्यार्थी, तरुणवर्ग वयोवृद्ध मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळेस सूत्रसंचालन माजी नगरसेवक अरविंद मोरे यांनी केले तर आभार सुनिल देहु गायकवाड यांनी केले.