Monday, April 28, 2025
Homeमहाराष्ट्ररायगडभात जाती जलद पैदास प्रकल्प मैलाचा दगड ठरणार - डॉ. पराग हळदणकर..

भात जाती जलद पैदास प्रकल्प मैलाचा दगड ठरणार – डॉ. पराग हळदणकर..

कर्जत केंद्रात झाले भूमिपूजन…

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र – कर्जत येथे ” मुख्यमंत्री कृषी संशोधन व निधी ” अंतर्गत मंजूर झालेला भात जातींची जलद पैदास व वाणांच्या चाचण्यांबाबत संशोधन संरचना उभारणी प्रकल्प शेती क्षेत्रात मैलाचा दगड ठरणार असे सुस्पष्ट प्रतिपादन डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे संशोधन तसेच विस्तार शिक्षण संचालक डॉ. पराग हळदणकर यांनी येथे केले. गतिमान पैदास प्रक्षेत्रावरील नियोजित स्थळी नारळ वाढवून सदर प्रकल्पाचे भूमिपूजन केल्यावर शुभेच्छापर मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कर्जत प्रादेशिक कृषी संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक व भात विशेषज्ञ डॉ. भरत वाघमोडे , विविध विभागाचे शास्त्रज्ञ, अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
डॉ. हळदणकर उपस्थितांना संबोधित करताना म्हणाले की, देशातील मोजक्याच जलद पैदास संशोधन केंद्रामध्ये ” कर्जत ” या केंद्राचा समावेश होणे, ही गौरवाची बाब आहे.
या तंत्रज्ञानामुळे भात जाती संशोधनात लागणारा कालावधी कमी होऊन जनतेच्या गरजेनुरूप वाण संशोधनास चालना मिळून विद्यापीठाच्या नाव लौकिकात निश्चित भर पडेल , असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. डॉ. वाघमोडे यांच्या नेतृत्वात कर्जत संशोधन केंद्राचा झपाट्याने कायापालट होत असल्याचे गौरवोद्गारही त्यांनी काढले. भात हे उसापेक्षा कमी पाणी लागणारे पीक असून त्यामुळे जमिनीत पाणी टिकून राहते. परिणामतः कोकणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या नाहीत, याकडे त्यांनी लक्ष वेधले. नियोजित वेळेपूर्वी हा प्रकल्प पूर्ण व्हायला हवा, अशी अपेक्षा व्यक्त करीत त्यांनी शास्त्रज्ञांना शुभेच्छा दिल्या.

कर्जत प्रादेशिक कृषी संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक व भात विशेषज्ञ डॉ. वाघमोडे म्हणाले की, आंतरराष्ट्रीय भात संशोधन संस्थेचे दक्षिण आशियातील विभागीय केंद्र असलेले वाराणसी, तामिळनाडूमधील कोईमतूर अशा मोजक्या केंद्रात हा प्रकल्प सुरू आहे. महाराष्ट्रात कर्जत येथे रुपये ४४१ लाख रुपयांचा प्रकल्प मंजूर झाल्याने भात संशोधनाला निश्चित नवी दिशा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कुलगुरू डॉ संजय भावे, कुलसचिव डॉ.प्रदीप हळदवणेकर, नियंत्रक जोईस,विद्यापीठ अभियंता पूजा इंगवले ( देसाई ) इ. चे वेळोवेळी सहकार्य मिळाल्याने त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन कर्जतचे विस्तार शिक्षण शास्त्रज्ञ डॉ. रवींद्र मर्दाने यांनी केले.
- Advertisment -

You cannot copy content of this page