Friday, November 22, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडभिसेगाव गावठाण जागेवरील गोर गरीब नागरिकांची अतिक्रमण घरे कायमस्वरूपी करा !

भिसेगाव गावठाण जागेवरील गोर गरीब नागरिकांची अतिक्रमण घरे कायमस्वरूपी करा !

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) कर्जत नगरपरिषद हद्दी मधील भिसेगाव गावठाण व शासकीय जमीन यावर गावामधील वाढत्या लोकसंख्येमुळे येथील गोर गरीब , कामगार असलेल्या रहिवाशांनी राहण्यासाठी शासकीय जमीन ५३/अ/१/अ/१ या ४.७४.३० हे आर चौ. मि. या ७/१२ मध्ये अंदाजे ७० ते ८० घरे बांधली आहेत. गेले कित्येक वर्ष सदरील रहिवासी हे कर्जत नगरपरिषदेला कर भरणा देखील करत आहेत , तसेच ते याच परिसरातील वडिलोपार्जित रहिवाशी आहेत व या ठिकाणी सर्व जाती जमातीचे नागरिक एकत्र राहत आहेत . तरी या रहिवाशांची घरे कायमस्वरूपी करून अतिक्रमण हा शिक्का उठवून त्यांना हक्काची घरे मिळावी , अशी मागणी कर्जत तालुक्यातील गोर गरीब यांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या ” नारी शक्ती ” या संघटनेच्या अध्यक्षा सौ. ज्योती जाधव – कुलकर्णी यांनी रायगड जिल्हाधिकारी – अलिबाग यांच्याकडे केली आहे.

शासन नियमानुसार सर्वांसाठी घरे – २०२२ या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रात असलेल्या सर्व शासकीय विभागांच्या ( वन विभाग वगळून ) जमिनींवरील अतिक्रमणे नियमानुकूल करण्याबाबत, महाराष्ट्र राज्य नगरविकास विभाग यांच्या कडील शासन निर्णय क्रमांक :- संकीर्ण- २०१९/प्र.क्र.१५/नवि-२६ , असा आदेश पारित केलेला आहे . या शासन निर्णयाची अंमलबजावणी केल्यास सर्व अटी – शर्ती चे पालन करण्याकरिता येथील नागरिक तयार असून अतिक्रमणे नियमानुकूल केल्यास ज्यादा कर पट्टीचा भुर्दंड पडणार नाही . या भागातील अनुसूचित जाती /अनुसूचीत जमाती / इतर मागासवर्गीय / आर्थिकदृष्ट्या दुर्बल प्रवर्गातील असे अतिक्रमण धारक सोडून इतर अतिक्रमण केलेले रहिवासी शासकीय २५% रककम देखील भरणा करण्यास तयार आहेत.

तरी येथील रहिवाशांची घरे नियमानुकुल शासन निर्णय प्रमाणे करण्यात यावी , यामुळे या नागरिकांची स्वतःचे घर असल्याचे स्वप्न आपल्या माध्यमातून साकार होईल. या करिता आपण या नागरिकांना त्यांचे हक्काचे घर मिळवून देण्याचे आपल्या स्तरावरून लवकरात लवकर सदरील प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी ” नारी शक्तीच्या ” अध्यक्षा सौ. ज्योती अमोघ कुलकर्णी यांनी सर्व भिसेगाव ग्रामस्थांच्या समवेत निवेदनाद्वारे केली आहे . यावेळी मा. जिल्हाधिकारी रायगड यांना निवेदन देता प्रसंगी भिसेगाव पोलीस पाटील संजय हजारे , अमोघ कुलकर्णी , रहिवासी अनंता जुनघरे , वैभव पवार , अनिता जूनघरे , सुप्रिया देशमुख , सरोज कुशवाह , नंदा बताले , अनिता लाड , वर्षा गाडवे , त्याचप्रमाणे इतर अनेक नागरिक उपस्थित होते.
- Advertisment -

You cannot copy content of this page