लोणावळा : लोणावळा येथील जग प्रसिद्ध व पर्यंटकांचे आवडते स्थान भुशी धरण हे पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्यासाठी रेल्वेने परवानगी द्यावी अशी मागणी खासदार श्रीरंग अप्पा बारणे यांनी लोकसभेत केली आहे.
भुशी डॅम येथे लाखो पर्यटक धरणाच्या पायरी वरून ओसांडणाऱ्या पाण्याचा आनंद घेण्यासाठी येत असतात त्या अनुषंगाने भुशी धरण हे पर्यटन स्थळ म्हणून विकसित करणे आवश्यक आहे. पर्यटन स्थळ विकसित करण्यासाठी रेल्वे विभागाने सहकार्य करावे.तसेच त्याबाबतची नाहरकत (एनओसी) रेल्वे विभागाने तत्काळ द्यावी, अशी मागणी शिवसेनेचे खासदार श्रीरंग अप्पा बारणे यांनी लोकसभेत केली आहे.
लोकसभेत बोलताना खासदार बारणे म्हणाले, मावळ लोकसभा मतदार संघातील लोणावळा येथे भारतीय रेल्वे विभागाचा भुशी डॅम आहे. 1860 मध्ये पाण्याच्या स्रोतासाठी डॅमची निर्मिती केली होती. पावसाळ्यात लाखोंच्या संख्येने पर्यटक भुशी डॅमवर येतात.
पुणे आणि मुंबईचे पर्यटक दरवर्षी लोणावळ्यातील भुशी डॅम काठोकाठ भरण्याची वाट पाहत असतात. डॅम ओव्हरफ्लो झाल्यानंतर या ठिकाणी दाखल झालेल्या पर्यटकांमध्ये धरणाच्या पायऱ्यांवर बसून पावसात चिंब भिजण्याचा आनंद, तसेच फोटोची क्रेझ देखील पाहायला मिळते. ओव्हरफ्लो झाल्यानंतर डॅम पर्यटकांचे आकर्षक केंद्र बनते. हे सौंदर्य बघण्यासारखे असते. डॅम ओव्हरफ्लो झाल्यानंतर वाहणारे पाणी पाहण्यासाठी लाखो पर्यटक येतात.
2014 मध्ये भारतीय रेल्वेने भुशी धरण खासगी क्षेत्राच्या सहभागाने पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्याची योजना जाहीर केली असून आजपर्यंत त्याच्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही. हे पर्यटन स्थळ केंद्र सरकार मार्फत विकसित होत नसेल. तर या पर्यटन स्थळावर पर्यटकांना सुविधा देण्यासाठी रेल्वे विभागातर्फे एनओसी दिली जावी. रेल्वे विभागाने एनओसी दिल्यास महाराष्ट्र सरकारचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे त्यांच्या माध्यमातून भुशी डॅम पर्यटनासाठी विकसित केले जाईल. त्यामुळे रेल्वेमंत्र्यांनी भुशी डॅम पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यासाठी सहकार्य करावे, अशी मागणी खासदार बारणे यांनी यावेळी केली आहे.