हालिवली – किरवली गावांचे रेल्वे कामामुळे झालेल्या नुकसानीची तक्रार थेट रेल्वे मंत्र्याकडे !
भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) गेली दोन वर्षांपासून कर्जत तालुक्यातील हालिवली व किरवली या गावातून पनवेल असा भुयारी रेल्वे मार्गाचे काम सुरू आहे . या भुयारी कामांच्या ब्लास्टिंगमुळे दोन्ही गावातील घरांचे अतोनात नुकसान झाले होते , तर बोअर वेल चे पाणी देखील आटले असल्याने याविरोधात हालिवली ग्रामपंचायतीच्या तत्कालीन सरपंच सौ. प्रमिला सुरेश बोराडे यांनी दोन वेळा आमरण उपोषण केले होते . मात्र नेहमी प्रमाणे कर्जत तहसीलदार शीतल रसाळ यांनी याच्या पाठीमागचा ” बोलविता धनी ” यांच्या मर्जीनुसार उपोषण कर्त्यांच्या तोंडाला पाने पुसून दिलेले कागदोपत्री आश्वासन पाळले नाही . या बाबीस एका वर्षाचा कालावधी उलटून गेला तरी न्याय मिळाला नसल्याने या सर्वांची तक्रार थेट केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव यांच्याकडे लेखी ते कर्जत येथे आले असताना केली.
कर्जत तहसीलदार यांनी ठेकेदाराला पाठीशी घालत आमच्या दोन्ही गावातील नुकसानग्रस्त ग्रामस्थांची ” घोर फसवणूक ” केली असून ” रायगड जिल्हाधिकारी ” देखील या सर्व बाबीत पाठराखण करत असल्याचे त्यांनी आरोप केला आहे . दोन वेळा नागरिकांची ” आर्त नुकसानीची ” मागणी करत आम्ही उपोषणाने लोकशाहीच्या सनदशीर मार्गाने न्याय मागितला , पण आम्हाला न्याय मिळाला नाही . कर्जत तहसीलदार यांनी लेखी दिलेल्या आश्वासनाला बगल देत एक वर्ष उलटूनहि त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी न करता रेल्वे प्रशासन व ठेकेदार यांना कर्जत तहसिलदार शीतल रसाळ यांनी पाठीशी घातले असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
त्यामुळे शनिवार दि.२० जुलै २०२४ रोजी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव यांची हालिवली मा. सरपंच सौ. प्रमिला सुरेश बोराडे यांनी कर्जत स्थानकावर भेट घेऊन तक्रार निवेदन दिले. या सर्वांवर कडक कारवाई होवून आम्हाला नुकसान भरपाई मिळावी , अशी विनंती त्यांनी केली , यावेळी रेल्वे मंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ चौकशीचे आदेश दिले आहेत.