if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
दत्ता शिंदे …..माथेरान
माथेरान अनलॉक केल्यापासून इथे कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली असून मागील काही दिवसातच इथे मृत्यूचे प्रमाण सुध्दा वाढलेले दिसत आहे त्यामुळेच कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आता जनता कर्फ्युच्या शिवाय पर्याय उरलेला नाही असे सूर माथेरानच्या कानाकोपऱ्यातुन घूमत आहेत.
सध्या जरी पर्यटकांची संख्या कमी प्रमाणात असली तरीसुद्धा पुढे पुढे कोरोना रुग्णांचे प्रमाण आपसूकच वाढणार आहे. दररोज चार ते पाच कोरोना रुग्ण आढळून येत आहेत तर दरदिवशी एक मयत होत आहे. पर्यटन हंगामाला अद्यापही वेळ असल्याने तूर्तास तरी माथेरान मध्ये पुन्हा लॉक डाऊन करण्यात यावे आणि जनता कर्फ्यु केल्यास सर्वात उत्तम होईल जेणेकरून कुणीही घराच्या बाहेर पडणार नाही अशीच खबरदारी पोलीस प्रशासनाने आणि नगरपरिषदेने घेतल्यास कोरोनाची ही दिवसेंदिवस वाढणारी शृंखला तुटण्यास मदत होऊ शकते. इथले काही नागरिक ताप, सर्दी, खोकला अथवा अन्य आजार सुध्दा अंगावर काढत आहेत.
आपल्याला कोरोना तर नाही ना या भीतीपोटी घरात राहून मेडिकल मधील तात्पुरत्या इलाजाच्या गोळ्या खाऊन दिवस ढकलत आहेत. त्यामुळेच अनेक जणांना मृत्यूला सामोरे जावे लागले आहे याचीही ताजी उदाहरणे नागरिक उघड्या डोळ्यांनी पहात आहेत. नगरपरिषदेच्या दवाखान्यात काही प्रमाणात का होईना जे रुग्ण स्वतःहून तपासणी अथवा इलाजासाठी जात आहेत त्यांना कार्यकुशल वैद्यकीय अधिकारी चांगल्या प्रकारे सेवा आणि उपचार करत आहेत याच वैद्यकीय अधिका-यांच्या सेवेमुळे अनेक रुग्ण बरे सुध्दा झाले आहेत.
परंतु अनेकजण बाजारात काहीच कारण नसताना फिरताना आढळून येतात त्यामुळे कोरोनाची ही वाढती शृंखला तोडणे कठीण होऊन बसले आहे.मागील पाच महिने लॉक डाऊन काळात एकही कोरोना रुग्ण सापडला नव्हता परंतु अनलॉक केल्यापासून या दुर्गम भागात सुध्दा कोरोनाने थैमान घातले असून या छोट्याशा गावात सर्वांचा सातत्याने एकमेकांशी संपर्क येत असतो त्यामुळेच नकळत रुग्ण वाढत आहेत.
सुरुवातीच्या काळात पोलीस प्रशासनाने उत्तम प्रकारे पेट्रोलिंग करून हा आजार आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले होते परंतु जर का या घडीला माथेरान मध्ये जनता कर्फ्यु लावला गेला नाही तर अनेकांना आपला जीव गमवावा लागणार आहे यात शंका नाही. प्रशासनाने याबाबत गांभीर्याने लक्ष केंद्रित करून इथल्या नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून ठोस भूमिका बजावणे क्रमप्राप्त बनले आहे.प्रत्येकाच्या घरात काही दिवस पुरेल इतका धान्य साठा आजही उपलब्ध आहे त्यामुळे निदान आठ दिवस तरी इथे जनता कर्फ्यु लावावा असे सूर सर्वत्र ऐकावयास मिळत आहेत.