if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
मावळ : तालुक्यातील प्रसिद्ध बैलगाडा शर्यतीचे मालक पंडीत जाधव ( वय 52, रा. जाधववाडी, नवलाख उंब्रे ) यांचे अपहरण करून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. खंडणी मागितल्याचा बनाव रचत आरोपींनी पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने जाधव यांचा मृतदेह जाळला. खंडणीविरोधी व औद्योगिक तक्रारी निवारण पथकाने गुन्ह्याचा छडा लावून एका आरोपीला अटक केली आहे.
14 नोव्हेंबर रोजी पंडीत जाधव हे अचानक बेपत्ता झाले होते. त्यांच्या नातेवाईकांना त्यांच्या व्हॉट्सअॅप नंबरवरून 50 लाख रुपयांची खंडणी मागणारा संदेश पाठवण्यात आला. कुटुंबीयांनी याबाबत तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फूटेज तपासले. त्यानुसार सुरज मच्छिंद्र वानखेडे (वय 23, रा. जाधववाडी) याच्या हालचाली संशयास्पद असल्याचे दिसून आले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असता त्याने आपल्या साथीदार रणजित कुमार (रा. बिहार) याच्यासह गुन्ह्याची कबुली दिली.
सुरजने चौकशीदरम्यान सांगितले की, खाजगी कारणावरून पंडीत जाधव यांचे अपहरण करण्यात आले. त्यानंतर दोरीने गळा आवळून त्यांचा खून केला. मृतदेह वहागाव (ता. खेड) येथील डोंगरावर जाळून पुरावा नष्ट केला. खंडणीची मागणी ही केवळ तपास चुकवण्यासाठी केलेला बनाव होता.
पंडीत जाधव यांचा मृतदेह जाळल्याचे निष्पन्न झाल्यानंतर आरोपींनी त्यांची गाडी पुन्हा जाधव यांच्या घराजवळ लावून संशय टाळण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करत पाच सिमकार्ड, दोन मोबाईल, आणि मृत्यूच्या ठिकाणाचे पुरावे गोळा केले.
सदर कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. खंडणीविरोधी पथकातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक सुनील भदाणे, आणि त्यांच्या पथकाने तपास करत आरोपींना अटक केली.
पंडीत जाधव यांच्या खून प्रकरणामुळे मावळ तालुक्यात खळबळ उडाली असून, या गंभीर गुन्ह्याचा पुढील तपास तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याकडून केला जात आहे.