कर्जतमध्ये शिवसेनेचा वर्धापन दिन वृक्षारोपण करून साजरा…
भिसेगाव-कर्जत/सुभाष सोनावणे)
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.उद्धव साहेब ठाकरे यांच्या सूचनेनुसार व युवासेना प्रमुख तथा पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य साहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आज ” शिवसेना ” या पक्षरूपी धगधगत्या अग्निकुंडाचा ५५ वा वर्धापन दिन अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करा , यामुळेच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी ” माझी वसुंधरा ” या संकल्पनेतून झाडे लावा आणि झाडे जगवा असा संदेश देण्यासाठी कर्जतमध्ये वृक्षारोपण कार्यक्रम कर्जत नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ.सुवर्णा केतन जोशी यांच्या शुभहस्ते करून साजरा करण्यात आला.
हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे , यांनी १९ जून १९६६ रोजी ” शिवसेना ” नावाचे एक धगधगते ज्वलंत अग्निकुंड उदयास आणले.महाराष्ट्राला शिवसेनेच्या माध्यमातून वाघाचे नेतृत्व देऊन गेले.मराठी माणसाच्या स्वाभिमानाला शिवसेनेनेच फुंकर घालून चैतन्य जागविले.आवाज कुणाचा , शिवसेनेचा , अशी सिंहगर्जना शिवसेनेच्या माध्यमातून करणारे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे या देशाला लाभलेले आगळे – वेगळे नेतृत्व , संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेनेच्या माध्यमातून ” जय महाराष्ट्र ” अशी आरोळी ठोकत अनेक कडवट शिवसैनिक तयार झाले.
आपल्या ठाकरी भाषेने अख्खा महाराष्ट्र पेटून उठला आणि हा – हा म्हणता ही ” वाघाची डरकाळी ” संपूर्ण महाराष्ट्रभर पोहचली. मराठी माणसाला एकाच विचारात , एकाच ध्येयात गुंतवून ठेवण्यासाठी प्रबोधनकार ठाकरे यांनी नाव दिलेले , मराठी माणसाचे सत्व जपणारी ” शिवसेना ” नावाचा सूर्य १९ जून १९६६ रोजी अखेर शिवतीर्थावर तळपला ! ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण करत ५५ वर्षे ध्येयवेड्या शिवसैनिकांच्या कठोर परिश्रमातून अखंडपणे धगधगत ठेवणारे हे ” यज्ञकुंड ” आजही ज्वलंत आहे.एकच लक्ष – एकच विचार – एकच नेतृत्व लाभलेले ” शिवसेनाप्रमुख ” शिवसेनेला लाभलेले युगपुरुषच म्हणावे लागतील.
ज्यांच्या कपाळी भगवा टिळा लागला , अशा अनेक शिवसैनिकांचे नशीबच शिवसेनेने बदलवले.या मर्द मावळ्या कडवट शिवसैनिकांच्या जोरावर ” शिवसेना ” हे ज्वलंत अग्निकुंड मा.उद्धव साहेब ठाकरे यांच्या रूपाने ” मुख्यमंत्री ” घडवून प्रखरतेने आजही तळपत आहे.शिवसेनेच्या ज्वलंत कुंडातून विचार घेऊन बाळासाहेबांचा आदेश व भगवा ध्वज खांद्यावर घेऊन काम करणारे कर्जतमधील स्वर्गीय अनंत काका जोशी यांची प्रेरणा घेऊन काम करत आज मी कर्जत नगर परिषदेची नगराध्यक्षा झाले , हे फक्त शिवसेनेतच घडू शकते , असे मत समस्त कर्जतकरांना शिवसेना पक्षाच्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देताना कर्जत न.प.च्या नगराध्यक्षा सौ.सुवर्णा केतन जोशी यांनी व्यक्त केले.
कर्जत शहरातील टेकडीवर वृक्षारोपण कार्यक्रम करताना नगराध्यक्षा सौ. सुवर्णा केतन जोशी , नगरसेविका तथा उपसभापती प्राची डेरवणकर , शहरप्रमुख भालचंद्र जोशी ,ज्येष्ठ शिवसैनिक मोहनशेट ओसवाल, दर्शन वायकर ,फरहान चौगुले, अभिजीत मुधोळकर ,सुरेश भरकले, नाना कण्रूक , मीना कुलकर्णी, शहर संपर्क संघटिका सायली शहासने , विभागप्रमुख सामिया चौगुले, निसर्गप्रेमी विष्णू भोईर, वैभव सुरावकर, रितेश वायकर, शकील शेख, उद्योजक केतनशेट जोशी इत्यादी उपस्थित होते.