वडगांव मावळ(प्रतिनिधी): मोरया महिला प्रतिष्ठानच्या संचालिकांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव कालावधीत दोनच दिवसांत विक्रमी 30 हजार राष्ट्रध्वज शिवले.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवनिमित्त संपूर्ण देशात 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान “हर घर तिरंगा” हि मोहिम राबवली जात असताना तालुक्यातील कर्मयोगी व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र यांच्या सहकार्याने मोरया महिला प्रतिष्ठानच्या माध्यमातून 15 ऑगस्ट रोजी झालेल्या स्वातंत्र्य दिनासाठी तिरंगा झेंडे शिवण्याचे काम महिलांना देण्यात आले होते.
नगराध्यक्ष मयुर ढोरे आणि प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अबोली ढोरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्याध्यक्षा चेतना ढोरे यांनी या कामात पुढाकार घेऊन मोरया महिला प्रतिष्ठानच्या जवळपास पंचवीस संचालिका आणि सदस्या यांनी दोनच दिवसांत सुमारे 30 हजार तिरंगा झेंडे शिवण्याचे काम यशस्वीरीत्या पूर्ण केले.
अध्यक्षा अबोली ढोरे यांनी सर्व महिलांचे विशेष कौतुक करताना त्या म्हणाल्या की प्रतिष्ठान मधील काही महिला भगिनींचा तयार कपड्यांचे उत्पादनाचा कायमस्वरूपी व्यवसाय आहे. पण, तिरंग्याचे शिवणकाम हा आपल्यासाठी देशाभिमानाचा विषय ठरला आहे. तसेच सर्व महिलांनी राष्ट्र ध्वज संहितेचे पालन करीत शिवणकाम पूर्ण केले यानिमित्ताने प्रतिष्ठान मधील सहकारी महिलांना एकप्रकारे देशसेवेची संधीच मिळाली. तसेच यातून प्रतिष्ठान मधील कष्टकरी सहकारी महिला भगिनींना थोडाफार रोजगार देखील उपलब्ध करून देण्यात आला.
आज या कामाचा मोबदला महिलांना भेट देण्यात आला. यावेळी मोरया महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अबोली ढोरे, उपाध्यक्षा प्रतिक्षा गट, कार्याध्यक्षा चेतना ढोरे, नगरसेविका पुनम जाधव, कविता नखाते आणि संचालिका, सदस्या उपस्थित होत्या.