राजिप चे मा. सभापती ” अशोकशेठ भोपतराव ” यांची रायगड जिल्हा ” कार्याध्यक्षपदी ” निवड !
भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) रायगड जिल्ह्यातील ” कर्जत – उरण – पनवेल ” विधानसभा मतदार संघात ” राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ” झेंडा सर्वत्र फडकविण्याच्या भूमिकेमुळे अनुभवी – राजकीय इच्छाशक्ती असलेला – ग्रामीण भागातील जनतेच्या समस्या जाणणारा व सोडविणारा – आणि गेली ४० वर्षे कर्जतच्या राजकारणात हिरीरीने भाग घेणारा कर्जत तालुक्यातील ” मुलुख मैदानी तोफ ” तथा राजिपचे मा. पशु संवर्धन सभापती ” अशोक शेठ भोपतराव ” यांची ” राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रायगड जिल्हा कार्याध्यक्षपदी ” प्रदेश अध्यक्ष तथा रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्या मान्यतेने त्यांच्या प्रमुख उपस्थितीत रोहा येथे आयोजित केलेल्या बैठकीत निवड करण्यात आली.
कर्जत तालुक्यातील कडाव या ग्रामीण भागातील दुसऱ्या मोठ्या बाजारपेठेत वास्तव्यास असलेले अशोक शेठ भोपतराव तालुक्याच्या राजकारणात राष्ट्रीय काँग्रेस पक्षात बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी तरुण वयात काम करायला सुरुवात केली . त्यांनी आपल्या ” कार्यकुशलतेने ” कडाव ग्रामपंचायत हद्दीत चांगल्या प्रकारे कामे केली व कडाव ग्रामपंचायत त्यांनी ताब्यात घेऊन त्यावर काँग्रेसचा झेंडा फडकावला व सरपंच झाले . राष्ट्रीय काँग्रेस पक्षात ते वजनदार नेते म्हणून त्यांची ओळख होती . जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ नेत्यांत त्यांचे नाव होते . १९९९ साली सुनील तटकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांनी प्रथम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करून त्यांचे हात त्यांनी मजबूत केले होते . राजिप उमरोली प्रभागातून ते जिल्हा परिषदेवर निवडून गेले व दुग्ध व पशू संवर्धन सभापती झाले . पहिल्या पासून रोख ठोक भाषण बाजीमुळे ते नेहमीच कोकणचे भाग्य विधाते अंतुले साहेबांनंतर तटकरे साहेबांच्या मर्जीतील होते.
कर्जत तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढीसाठी त्यांनी प्रचंड मेहनत घेतली . या राजकीय काळात त्यांनी कर्जत तालुक्या बरोबरच जिल्ह्याची पदे यापूर्वी देखील भूषवली आहेत . वेळ तीच मात्र नेतृत्व नवीन अश्या अजित दादा पवार यांच्या नेतृत्वाखाली रायगडात सुनील तटकरे यांच्या बरोबर ते राष्ट्रवादीत गेले . राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा प्रदेश सचिव पदाची धुरा त्यांच्याकडे होती . मात्र आता जिल्ह्यात कर्जत – उरण – पनवेल विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक जोमाने वाढण्यासाठी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत त्यांच्या सारखा ” मुत्सद्धी नेता ” असणे गरजेचे असल्याने कर्जत मतदार संघ ” राष्ट्रवादीचा ” पुन्हा एकदा बालेकिल्ला करण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते तथा कर्जत विधानसभा मतदार संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष ” सुधाकर भाऊ घारे ” यांचे हात मजबूत करण्यासाठी त्यांच्या बरोबरीस हा अनुभवी व कुशल मुलुख मैदानी तोफ असावी म्हणून आता पुन्हा एकदा रायगडच्या राजकारणात अशोक शेठ भोपतराव हे गरजणार असल्यानेच त्यांच्यावर रायगड जिल्हा कार्याध्यक्ष पदावर त्यांची नेमणूक प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी केली आहे.
कर्जत – उरण – पनवेल विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ” झेंडा ” सर्वत्र फडकविण्याच्या इरादा त्यांनी व्यक्त करत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेब यांनी माझ्यावर टाकलेला विश्वास सार्थकी ठरवेन , असा मानस त्यांनी याप्रसंगी व्यक्त केला . त्यांच्या या निवडीमुळे त्यांच्यावर सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.