कामशेत(प्रतिनिधी) : मागील 2 वर्षापासून रखडलेला कामशेत येथील रेल्वे भुयारी मार्ग कायमस्वरूपी बंद करावा व त्या ठिकाणी रेल्वे प्रशासनाकडून उड्डाणपूल बांधण्यात यावा . या प्रमुख मागणीसाठी पुकारलेल्या जलसमाधी अंदलोनास आज बुधवारी ता .17 सर्वपक्षीय नेते व नागरिकांसह विद्यार्थ्यांनी देखील प्रचंड सहभाग नोंदविला. यावेळी रेल्वे प्रशासनाकडून व पुणे ग्रामीण पोलिसांकडून मोठ्या प्रमाणावर फौज फाटा तैनात करण्यात आला होता.
नाणे मावळातील वडिवळे , वळक , सांगीसे , बुधवडी , वेल्हवळी , नेसावी , खांडशी , उंबरवाडी या गावांना जाण्यासाठी रेल्वेच्या गेट क्रमांक 42 मधून जावे लागते पर्यटन , लघुउद्योग तसेच नोकरदार , विद्यार्थी , व्यवसायिक आदींमुळे या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणावर रहदारी होत असते.
यामुळे रेल्वे प्रशासनाकडून या ठिकाणी उभारण्यात येत असलेल्या भुयारी मार्गात पाणी साचत असून मागील 2 वर्षांपासून हे काम रखडल्याने नागरिकांना मोठया प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. या भुयारी पुला ऐवजी त्याठिकाणी उड्डाणपूल उभारावा व कामशेत बाजारपेठेत जाणारा जुना राष्ट्रिय महामार्ग तातडीने पूर्ववत करून खुला करावा या मागणीसाठी जलसमाधी आंदोलन पुकारण्यात आले होते. परंतु पोलीस प्रशासनाने समय सूचकता दाखवत आंदोलन ठिकाणी येणाऱ्या आंदोलकांना बॅरिगेट्स लावत अडवले व जलसमाधी घेण्यापासून रोखले.