Friday, October 18, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडलाचखाऊ प्रकरणात कर्जत तालुका आघाडीवर , चंगळवाद वाढल्यानेच भ्रष्टाचाराची प्रकरणे ! 

लाचखाऊ प्रकरणात कर्जत तालुका आघाडीवर , चंगळवाद वाढल्यानेच भ्रष्टाचाराची प्रकरणे ! 

मंडळ अधिकारी दिनेश गुजराथी ७ हजाराची लाच घेताना जेरबंद…

भिसेगाव-कर्जत ( सुभाष सोनावणे) पुराण काळातील ” वाटमाऱ्या वाल्या कोळ्याची ” कथा आपल्याला सर्वांना माहीतच असेल , ” तूच तुझ्या पापाचा वाटेकरी ” , असे सांगणारी त्याची पत्नी या आधुनिक आणि तंत्रज्ञान युगात आढळल्यास भ्रष्टाचाराला आळा बसून देश सुधारण्यास नक्कीच हातभार लागेल , असेच लाच घेणाऱ्या कुटुंब प्रमुख असणाऱ्या शासकीय अधिका-यांच्या बाबतीत म्हणावे लागेल . चंगळवाद वाढलेल्या या जमान्यात पाच आकडी पगारा व्यतिरिक्त जादा कमाई आपला पती व बाबा कुठून आणतोय , यावर आता कुटुंबातील पत्नी , मुले यांनी लक्ष ठेवणे गरजेचे आहे , तरच भ्रष्टाचाराला चाप बसून देशव्यापी वाढत असलेल्या भ्रष्टाचारी शासकीय अधिकारी – कर्मचारी वर्गाला चपराक बसेल .एका पेक्षा अनेक घटना कर्जत तालुक्यात होत असताना लाच घेण्यात आता कर्जत तालुका आघाडीवर म्हणायला हरकत नाही.
भूमी अभिलेख कार्यालय कर्जत येथील दि.१३ जुलै २०२२ रोजी लाच मागणारे भूमीकरलेखक बालाजी रावसाहेब राऊत , वय – ३२  यांना २५ हजारांची लाच घेताना जेरबंद केले असताना आता महसूल विभागाचे मंडळ अधिकारी दिनेश गुजराथी , वय – ५७ , यांना ७ हजारांची लाच घेताना कशेळे येथे पकडले आहे.कर्जत तालुका हा मुंबई – पुणे रेल्वे प्रवासा दरम्यानचा मध्य आहे . आदिवासी बहुल भाग असला तरी येथे मुंबई स्थित धनाड्यांच्या जमीन खरेदी – विक्रीमुळे करोडो रुपयांची कामे येथे होत असतात. शासकीय अधिका-यांचे हात गरम झाल्यावर  ” घंटो का काम , मिनिटो में ” करून देत असताना या अधिकारी वर्गांना त्याची सवय लागते.
हि साखळी वर पासून खालपर्यंत असल्याने सामान्य नागरिकांची कामे होत नसल्याच्या तक्रारी केल्यातरी त्यावर कुठलीच कारवाई दिसून येत नाहीत . पैसे द्या , तरच काम होईल , अशी अडवणूक करत स्थानिक भूमिपुत्रांना देखील हे अधिकारी त्रास देतात . आणि मग वैतागलेला सामान्यजन कायद्याचा आधार घेत अश्या भ्रष्टाचारी अधिकारी वर्गाची लाच घेताना पकडून देऊन चांगलीच मुस्कटदाबी करतो.यापूर्वी कर्जतमध्ये तहसील कार्यालयात तहसीलदार , कर्जत तलाठी , कर्जत नगर परिषद , वीज कंपनी अभियंता ,  वन विभाग , भूमिअभिलेख कार्यालयात ११ डिसेंबर २०२१ मध्ये छाननी लिपिक दत्ता जाधव यांस १० हजार लाच घेताना पकडले होते , तर १३ जुलै २०२२ रोजी बालाजी राऊत नंतर पुन्हा एकदा महसूल विभागाचा मंडळ अधिकारी दिनेश गुजराथी हा बडा मासा लाचलुचपत अधिकारी वर्गाच्या जाळ्यात अडकला आहे . आता हि दुसरी घटना घडली आहे.

कर्जत तालुक्यातील कशेळे येथील मंडळ अधिकारी दिनेश गुजराती हे सात हजारांची लाच घेताना अलगद अँटी करप्शन ब्युरो च्या जाळ्यात सापडले . या घटनेतील तक्रारदार हे स्टेट बँक ऑफ इंडियाचे रिकवरी एजंट आहेत . कर्जत तालुक्यातील जांभरूग परिसरात असलेला एक रो हाऊस हा स्टेट बँक ऑफ इंडिया कडून सील करण्यासाठी न्यायालयाने आदेश दिलेत होते , ते काम झटपट करून देण्याच्या बदल्यात येथील मंडळ अधिकारी दिनेश रमाकांत गुजराती यांनी तब्बल १५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली असता तक्रारदार ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे गेल्याने तपासाची चक्र वेगात फिरवून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला होता , ठरलेल्या रकमेपैकी दहा हजार रुपये देण्याचं ठरलं त्यातील सात हजारांची रक्कम दिनांक २ नोव्हेंबर २०२२ रोजी फिर्यादींना देताना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने दिनेश गुजराती यांना रंगेहात पकडले असून या गुन्ह्यातील रक्कम जप्त करण्यात आली आहे.
सदरचा सापळा हा सुरेश चोपडे पोलीस निरीक्षक , सपोउपनि सोंडकर ,पोहवा/संदेश शिंदे, म पोहवा/ दिपाली गणपते तर त्यांना मार्गदर्शन अधिकारी म्हणून पंजाबराव उगले, पोलीस अधीक्षक, एसीबी ठाणे परिक्षेत्र , अनिल घेरडीकर, अप्पर पोलीस अधीक्षक, एसीबी ठाणे परिक्षेत्र हे अधिक तपास करत आहेत . तपासा अंती खूप घबाड मिळण्याची शक्यता आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page