सुरक्षारक्षक, सीसीटीव्ही आणि रात्रीच्या गस्तीसाठी निवेदन..
लोणावळा : स्वारगेट बस डेपो (पुणे) येथे काही दिवसांपूर्वी एका मुलीवर अमानुष प्रकार घडला. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने लोणावळा बस डेपो येथे सुरक्षा उपायांची पाहणी करण्यात आली. बस डेपोमध्ये सुरक्षारक्षक नेमण्याची, सीसीटीव्ही यंत्रणा सक्षम करण्याची आणि अन्य सुरक्षेसंदर्भात उपाययोजना करण्याची मागणी निवेदनाद्वारे बस डेपो व्यवस्थापनाकडे करण्यात आली.
यासोबतच, लोणावळा पोलीस ठाण्यातही निवेदन सादर करून, स्वारगेट बस डेपोतील घटनेतील दोषींना फाशीची शिक्षा व्हावी, तसेच लोणावळा बस डेपो परिसरात रात्री गस्त वाढवावी, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी शिवसेना महिला आघाडी पुणे जिल्हा सहसंपर्क संघटक शादान चौधरी, शिवसेना लोणावळा शहर प्रमुख परेश बडेकर, शहर समन्वयक जयवंत दळवी, शहर सल्लागार रामभाऊ थरकुडे, उपशहर प्रमुख विजय आखाडे, नरेश काळवीट, विभाग प्रमुख संजय (पिंटू) शिंदे, विभाग संघटक गणेश फरांदे, महिला आघाडी उपशहर संघटक प्रतिभा कालेकर, महिला आघाडी विभाग संघटक शोभा चव्हाण यांसह शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.