लोणावळा (प्रतिनिधी): लोणावळा शहर पोलीस स्टेशनच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने धडाकेबाज कामगिरी करत विनापरवाना विक्रीसाठी चालवलेल्या तब्बल 78 हजार रुपयांच्या विदेशी दारुसह 6 लाख रुपयांची बोलेरो गाडी असा एकूण 6 लाख 78 हजारचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी सायंकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास लोणावळा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाचे पोलीस नाईक हनुमंत शिंदे, मनोज मोरे, पवन कराड यांना एक बोलेरो कार क्र.(MH 02 FU 2164) ही संशयित रित्या उभी असलेली दिसली. पोलीस निरीक्षक सिताराम डुबल यांच्या मार्गदर्शनाखाली या गाडीची झाडाझडती घेतली असता त्यात वेगवेगळ्या प्रकारची विदेशी दारू मिळून आली.
चौकशी केली असता यातील आरोपी अब्रार आयुब शेख (वय 47 वर्षे, रा.भोसले गार्डन, हडपसर, पुणे) हा त्याच्या ओळखीच्या लोकांना सदरची दारू विक्री करीता घेऊन चालला होता. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल मनोज मोरे यांनी फिर्याद दिली असून मु. प्रो. अॅक्ट क. 65 (ई) (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक हनुमंत शिंदे हे करीत आहे.