( मावळ प्रतिनिधी )
लोणावळा : राज्य सरकारकडून राज्यात गुटखा बंदी असताना बाहेरील राज्यातून छुप्या मार्गाने आपल्या राज्यात गुटखा आणला जात आहे. त्यासंदर्भात राज्यातील पोलीस प्रशासन व अन्न औषध प्रशासनाकडून अनेकदा कारवाई केली गेली ज्यामध्ये फक्त माल जप्त करून वाहन चालकावरच कारवाई केली जाते. त्यामुळे राज्यात बेकायदेशीर गुटखा आयात निर्यातीमागचे मूळ सूत्रधार अद्याप मोकाट आहेत. अशा ह्या मोकाट असलेल्या मूळ सूत्रधारांविरुद्ध कठोर पाऊल उचलत मोका अंतर्गत कारवाई करण्याचा विचार राज्य सरकारने केला आहे.
राज्यात गुटखा बंदी असूनही लोणावळ्यात लाखोरुपयांच्या गुटख्याची विक्री होत असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.लोणावळ्यात हा गुटखा येतो कुठून ? व लोणावळ्यातील दुकानदारांना गुटखा पुरवतं कोण ? असा प्रश्न वारंवार निर्माण होत आहे. ह्या गुटखा विक्रेत्यांचा तपास करून त्यांच्यावर कारवाई होणार का असाही प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.
संपूर्ण शहर व परिसरातील लहान मोठी टपरी आणि दुकानांमध्ये अगदी बिनधास्तपणे, व सहजपणे दहा ते पंधरा रुपयात गुटखा मिळत असल्यामुळे शहरातील अनेक तरुनांचा कल गुटख्याच्या दिशेने अधिक असून. शहरातील तरुण, कामासंदर्भात आलेले परप्रांतीय तरुण व प्रौढ असे अनेक लोक गुटख्याच्या आहारी जाऊन जास्त प्रमाणात याचे सेवन करत आहेत. आणि शहरातील गल्ली बोळे थुंकून लाल करत आहेत. यांना आळा घालणार कोण ? राज्यातील लॉक डाऊन जरी शिथिल केले असले तरी आचारसंहितेसंदर्भात शासनाकडून काही निर्बंध लागले आहेत.
त्याचप्रमाणे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याकरिता मावळातील पर्यटन स्थळांवर पर्यटकांस बंदी घातली असून सार्वजनिक ठिकाणी तोंडाला मास न लावता सहवासावर निर्बंध लागले आहेत.तसेच सार्वजनिक ठिकाणी दारू पिणे, गर्दी करणे व सार्वजनिक ठिकाणी थुंकणे यावरही शासनाचे निर्बंध अद्याप लागलेले आहेत.ह्या संदर्भात लोणावळा प्रशासनाकडून कुठलीही कसर बाकी सोडली नसून ह्यावर्षी स्वच्छ सर्वेक्षण अभियानात लोणावळा नगरपरिषदेचा देशात तिसरा क्रमांक आला आहे. याचा सर्व लोणावळेकरांना अभिमान आहे.
त्यासाठी स्थानिक प्रशासनाकडून खबरदारीही घेण्यात येत आहे. परंतु शहरातील गुटखा खाऊन थुंकणाऱ्या गुटखा प्रेमींना मात्र कोरोनासंदर्भात शासनाच्या सूचनांचा विसर पडला असून कसली भीती नाही, शहराचा अभिमानही नाही. अशाच काही गुटखा प्रेमींकडून शहरातील रस्ते, लहान मोठे चौक, चहा नाश्त्याची ठिकाणे यासारख्या परिसरात बऱ्याच ठिकाणी गुटखा थुंकून रंगरंगोटी केल्याची चित्र दिसत आहेत. सध्या पाऊस सुरु असल्यामुळे थुंकलेला गुटखा धुवून जात आहे पण त्याचे डाग मात्र त्याठिकाणी वास्तव्य करत आहेत.
सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यामुळे शहरात घाणीचे साम्राज्य निर्माण होईल, रोगराई चालना मिळेल, आणि त्यामुळे कोरोनाचा संसर्ग ही वाढू शकतो, ह्या महत्वाच्या बाबी कडे कोण घालणार लक्ष ? ह्या गुटखा प्रेमींच्या अशा बेजबाबदार वागण्याला कसा बसणार आळा ? कोण थांबविणार ही गुटख्यामुळे होणारी शहरातील रंगरंगोटी ? कोण पुसणार ही बेजबाबदारीने रेखाटलेली चित्रे ? यासाठी स्थानिक प्रशासनाबरोबर शहरातील नागरिकांनाही पुढाकार घ्यावा लागेल का असे प्रश्न निर्माण होत आहेत.
शहरात बऱ्याच प्रमाणात गुटखा खरेदी व विक्री सुरु आहे. शहरातील लहान मोठया टपऱ्या असो वा एखादे जनरल स्टोअर असो गुटखा मात्र अगदी सहजपणे मिळतो. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शहरातील काही होलसेल व्यापाऱ्यांकडून परिसरातील ग्रामीण भागात आणि शहरातील अनेक लहान मोठया व्यापाऱ्यांना गुटखा पुरविला जात आहे . जर ह्या गुटखा विकणाऱ्या होलसेल व्यापाऱ्यांचा पर्दाफाश करून कारवाई केल्यास शहरातील गुटखा प्रेमींना आपोआप आळा बसेल. त्यामुळे शहरातील नकळत होणारी रंगरंगोटी थांबेल.