Saturday, November 23, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडसमर्थ रेसिडेन्सी - गुंडगे येथील रहिवाशांनी एकत्र येऊन बिल्डरला शिकवला धडा !

समर्थ रेसिडेन्सी – गुंडगे येथील रहिवाशांनी एकत्र येऊन बिल्डरला शिकवला धडा !

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) आजच्या या ” शो – शायनिंग ” व ” चमकेश दुनियेत ” मुखवटा बदलून वावरणारे व आपल्याकडे जे आहे ते नजरेत भरेल असे दाखविण्याची ” चालबाज कला ” सर्वसामान्य जनतेची फसवणुकीचा विषय बनलेला आहे . आपल्या ” आयुष्याची पुंजी ” घर घेणे कामी वापरून घर देताना मात्र बिल्डरांच्या अनेक अडचणींवर मात केल्यावरच ते मिळत असते . नवीन घर घेतले की अनंत अडचणींना तोंड द्यावे लागले हे सर्वश्रुत झाले आहे , कारण घर घेते वेळी गोड बोलणारा बिल्डर काही ना काही कामे न करता नंतर , घर घेतलेल्या व्यक्तीला फार मन:स्ताप देतो . पाणी , विजेची जोडणी , सोसायटी रजिस्ट्रेशन , डिम्ड कन्हव्हेन्स अशा अनेक बाबी यात मोडतात , पण एखाद्या संकुलात घर घेतलेल्या नागरिकांनी एकत्र येवून एकीने यास विरोध केला तर बिल्डरला नमते घ्यावेच लागते . म्हणूनच शासनाने देखील बिल्डरला ” सुतासारखा सरळ ” करण्यास कायद्यात काही सुधारणा करून घर घेणार्‍या व्यक्तींना दिलासा दिला आहे.

अशीच एक घटना कर्जत न. प. हद्दीतील गुंडगे – विश्वनगर येथे ” समर्थ रेसिडन्सी ” या नवीन बांधण्यात आलेल्या इमारतीत घडली आहे . अनेक नोकरदार व्यक्तींनी आपले ” स्वप्नातील घर ” सन २०१५ साली घेतले , तेंव्हापासून अनेक खोल्यांची नोंदणी उपनिबंधकांकडे झाली . पार्ट वन ओ.सी . प्राप्त झाल्यानंतर अनेकांना घर घेण्यासाठी कर्जही मिळाले , पण २०२४ साल उजाडले तरी वरील इमारतीचा विकासक सोसायटी रजिस्ट्रेशन करुन देत नव्हता , उलट दर महिना मासिक मेन्टेनन्सची रक्कम मागू लागला , अनेक कामे प्रलंबित ठेवली होती . खूपच मनस्ताप सहन केल्यावर अखेर सर्वांनी एकजूट करुन ” नाँन कोआँपरेशन फाँर्म बिल्डर ” या कलमाखाली कर्जत उप निबंधकाकडे सोसायटी रजिस्ट्रेशनसाठी अर्ज दाखल केला , त्यांनी तो जिल्हा मुख्यालय अलिबाग येथे पाठवला. तीन ते चार सुनावण्या झाल्यानंतर अलिबाग मुख्य निबंधकांनी सोसायटी रजिस्ट्रेशनची परवानगी अर्ज करणाऱ्या सदनिका व्यक्तींना दिली . नंतर त्या आधारे कर्जत येथील उपनिबंधक अधिकारी यांनी ” समर्थ रेसिडेन्सी ” मधील रहिवाशांना स्वतंत्र सोसायटी रजिस्ट्रेशनची परवानगी दिली . कर्जतमध्ये अशा अनेक इमारती मधील हजारो रहिवासी त्रस्त आहेत , पण कर्जत येथील समर्थ रेसिडेन्सी मधील रहिवाश्यांनी एकत्रीत येवून लढा दिला आणि ” विजयश्री ” खेचून आणली.

या संदर्भात सोसायटी मधील कार्यकर्त्यांशी संवाद साधला असता ते म्हणाले अशा केसेसमध्ये शासनाने विकासकावर कायद्याने कडक कारवाई केली पाहिजे , तरच अशा ” भुरट्या विकासकांना ” धडा मिळेल . या कामी कोकण मराठी साहित्य परिषदेचे ठाणे जिल्हाध्यक्ष कवी बाळ कांदळकर , बँन्क आँफ बडोदयात काम करणारे श्री किशोर पराड , समाजसेवक श्री आकाश आमकर , निवृत मुंबई मनपा अधिकारी श्री राजेन्द्र एखे , हॉटेल व्यवसायीक श्री रविंद्र शेट्टी या सर्वांनी आपला वेळ खर्च करून येथील सदनिकांना दिशा दाखविण्याचे काम केले आहे , तर कायदेशीर सल्लागार म्हणून कर्जत मधील ख्यातनाम वकील ऍड. पूजा सुर्वे यांनी यात महत्त्वपूर्ण मार्गदर्शन करून यश मिळवून दिले आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page