Wednesday, October 16, 2024
Homeपुणेलोणावळासहा. पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या नेतृत्वाखाली 3 किलो गांजा आणि प्रतिबंधित...

सहा. पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या नेतृत्वाखाली 3 किलो गांजा आणि प्रतिबंधित गुटख्याचे 3.87 लाखांचे मुद्देमाल जप्त; पाच जण अटकेत..

सहा. पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या नशामुक्ती अभियानांतर्गत मोठी कारवाई: 3 किलो गांजा आणि 128 पुडे प्रतिबंधित गुटख्यासह 3.87 लाखांचा मुद्देमाल जप्त, पाच आरोपींना अटक..
लोणावळा : उपविभागात अमली पदार्थांची विक्री व प्रतिबंधित गुटख्याचा साठा यावर कठोर कारवाई करत सहा. पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथकाने दोन मोठ्या कारवाया करून सुमारे 3 किलो गांजा व 128 पुड्डे प्रतिबंधित गुटखा जप्त केला. या कारवायांमध्ये एकूण 3 लाख 87 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
पहिली कारवाई: 21 सप्टेंबर 2024 दिनांक 21 सप्टेंबर 2024 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास, सहा. पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांना गुप्त माहिती मिळाली की लोणावळा परिसरातील भैरवनाथ नगर, कुसगाव बु. येथील काही व्यक्ती गांजा व प्रतिबंधित गुटखा विक्री करत आहेत. या माहितीच्या आधारे सत्यसाई कार्तिक यांनी आपल्या पथकासह रात्रीच्या सुमारास छापा टाकला.
पोलीस पथकाने लक्ष्मी लॉंड्रीजवळील एका घरात छापा मारला असता, तीन इसम मिळून आले. त्यांची झडती घेतली असता, 737 ग्रॅम गांजा व 128 पुड्डे प्रतिबंधित गुटखा तसेच क्वालिस चारचाकी वाहन असा एकूण 3 लाख 27 हजार 137 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अटक करण्यात आलेले आरोपी अब्बास तपषिर खान उर्फ अरबाज (वय 21 वर्षे ) आवान आब्बास तपषिर खान उर्फ मुन्ना ( वय 19 वर्षे ) अश्विन चंद्रकांत शिंदे ( वय 38 वर्षे ) यांच्यावर लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये एनडीपीएस व विविध कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून, या प्रकरणाचा पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक प्रशांत आवारे हे करत आहेत.
दुसरी कारवाई दिनांक 22 सप्टेंबर रोजी लोणावळा शहर पोलीस स्टेशन हद्दीतील इंद्रायणीनगर, लोणावळा येथे करण्यात आली. याठिकाणी महेमुना सत्तार कुरेशी (वय 54 वर्षे) हिने तिच्या कामगाराच्या मदतीने गांजा विक्री करत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकला असता, 2 किलो 168 ग्रॅम गांजा व रोख रक्कम असा एकूण 59 हजार 880 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अटक करण्यात आलेले आरोपी महेमुना सत्तार कुरेशी (वय 54 वर्षे)राजु लहु जाधव (वय 55 वर्षे)यांच्यावर लोणावळा शहर पोलीस स्टेशन येथे एनडीपीएस व अन्य कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भिसे हे करत आहेत.
पोलीस यंत्रणेची महत्त्वपूर्ण भूमिका :
या संपूर्ण कारवाईत पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख आणि अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांचे मार्गदर्शन होते. सहा. पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या नेतृत्वाखाली सपोनि प्रशांत आवारे, मसपोनि विजया म्हेत्रे, सपोनि राहुल लाड, पोलीस उपनिरीक्षक लोसरवार, पो.हवा नितेश कवडे, मपो.हवा अश्विनी शेडगे, पो.कॉ गणेश येळवंडे, सुभाष शिंदे, गणेश ठाकुर आणि प्रतिक काळे या पथकाने या कारवाया केल्या.
सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी पदभार स्वीकारल्यानंतर लोणावळा उपविभागात अवैध धंद्यांवर कायदेशीर कारवाई करत नशामुक्ती अभियान सुरू केले आहे. या मोहिमेत परिसरातील तरुणांना जनजागृती करून अमली पदार्थांचा वापर व साठवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येत आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page