Tuesday, December 3, 2024
Homeक्राईमसहा. पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तीक यांची दणकेबाज कारवाई: 48 किलो गांजासह पंधरा...

सहा. पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तीक यांची दणकेबाज कारवाई: 48 किलो गांजासह पंधरा लाखांचा मुद्देमाल जप्त, तीन जण जेरबंद..

लोणावळा (प्रतिनिधी.श्रावणी कामत): लोणावळा उपविभागाचे सहा. पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी त्यांच्या पदभार स्वीकृतीनंतर अवैध धंद्यांवर आणि गुन्हेगारांवर कठोर कारवाईची मालिका सुरू ठेवली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली, संकल्प नशामुक्ती अभियानांतर्गत, परिसरातील अमली पदार्थांचे सेवन आणि विक्री विरोधात प्रभावी कारवाई सुरू आहे.
गेल्या काही दिवसांपासून लोणावळा विभागात अमली पदार्थांची चोरून विक्री होत असल्याची माहिती श्री कार्तिक यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे, त्यांनी परिसरातील युवकांमध्ये जनजागृती अभियान सुरू केले आणि अमली पदार्थांचे सेवन, साठवणूक, व विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई सुरू केली.
दिनांक 11 जुलै 2024 रोजी, गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, कार्ला फाटा परिसरात काही इसम चारचाकी वाहनांमधून गांजा विक्रीकरिता घेऊन येणार आहेत. या माहितीच्या आधारे, श्री कार्तिक यांनी मध्यरात्रीपासूनच कार्ला फाटा परिसरात पथकासह सापळा रचला.
पहाटे 03.05 वाजता, जुने मुंबई पुणे हायवे रोडवरील तेजस धाब्याच्या समोर एक संशयित वाहन थांबल्याचे दिसले. वाहन थांबवून चौकशी केली असता, इसमांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने त्यांच्या वाहनाची तपासणी करण्यात आली. तपासणीमध्ये, वाहनाच्या डिक्कीत दोन पोत्यांमध्ये रु. 9,20,000/- किमतीचा 48 किलो गांजा आढळला. पंचांसमक्ष माल सीलबंद करून ताब्यात घेण्यात आला.
लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात, पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण यांनी सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरून, एन.डी.पी.एस ॲक्ट 1985 चे कलम 8(क), 20(ब) (क), 29 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे करत आहेत.
सदर कारवाईमध्ये नितीन शिवाजी लेहने (वय 38 वर्ष, रा. औरंगपूर, तालुका शिरूर, जिल्हा बीड), संदिपान पाटलोबा गुट्टे (वय 39 वर्ष, रा. परळी वैजनाथ, तालुका परळी, जिल्हा बीड), आणि गणेश सुरेश दराडे (वय 30 वर्ष, रा. केज, तालुका केज, जिल्हा बीड) यांना अटक करण्यात आली आहे.
संकल्प नशामुक्ती अभियानांतर्गत केलेल्या वरील कारवाईमध्ये 48 किलो गांजासह एकूण रु. 14,60,000/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, पोलीस यंत्रणा सखोल तपास करत आहे.
सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली, लोणावळा उपविभागाचे सहा. पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक, पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, पो.हवा नितेश (बंटी) कवडे, पो.हवा अंकुश नायकुडे, पो.ना दत्ता शिंदे, पो.कॉ गणेश येळवंडे, पो.कॉ सुभाष शिंदे, पो.कॉ महेश थोरात यांचे पथकाने केली आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page