लोणावळा : वरसोली मनशक्ती प्रयोग केंद्र व लोणावळा नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 19 नोव्हेंबर रोजी लोणावळ्यातील विविध परिसरामध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
यादरम्यान नाना नानी पार्क नांगरगाव परिसर, मनशक्ती आश्रम ते मॅप्रो गार्डन, मॅप्रो गार्डन ते कुमार रिसॉर्ट, कुमार रिसॉर्ट ते रायवूड पार्क पोलिस चौकी तसेच लोणावळा डॅम परिसर अशा विविध ठिकाणी तसेच वरसोली गावामध्ये कचरा संकलन आणि स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
या स्वच्छता मोहिमेत मनशक्ती प्रयोग केंद्राचे सुमारे दीडशे साधक कार्यकर्ते, लोणावळा नगर परिषदेतील स्वच्छता विभागातील कर्मचारी व वरसोली ग्रामपंचायतीतील स्वच्छता कर्मचारी यांनी एकत्रित परिसरातील स्वच्छतेचे काम केले.
सर्व अभियानकर्त्यांनी या मोहिमेतून सुमारे सव्वादोनशे बॅग इतका कचरा गोळा करून नगरपरिषदेच्या कचरा वाहणाऱ्या वाहनाच्या माध्यमातून वाहून नेण्यात आला. या कामाबद्दल नगरपरिषदेचे कर्मचारी यांनी समाधान व्यक्त केले. या कामांमध्ये लोणावळा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सुरेखाताई जाधव, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सोमनाथ जाधव व कार्यकर्ते तसेच सरकारी अधिकारी यांनी सहकार्य केले.
शेवटी स्वच्छतेची शपथ आणि मनशक्ती केंद्राची समाजसेवेची प्रार्थना म्हणण्यात आली.
सदर उपक्रमाचे आयोजन हे मनशक्ती केंद्राचे विश्वस्त प्रल्हाद बापर्डेकर व अन्य कार्यकर्ते यांनी केले आहे.