कोरोना योद्धा म्हणून खेड पोलीस स्टेशनचा सन्मान डॉ अभिनव देशमुख यांच्या हस्ते !

0
47

पुणे : कोविड काळात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांमधील खेड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गुरव यांचा सन्मान करण्यात आला.

कोरोना काळात सर्वत्र भितीचं वातावरण असताना पोलीस दलातील सर्वच कर्मचारी जीवाची पर्वा न करता रस्त्यावर उतरले. नागरिक घराबाहेर पडायला घाबरत असताना लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी, बाहेर जाणार्‍या लोकांची जेवणाची व प्रवासाची सोय तर रूग्णांना घरातून उचलून त्यांना बेड मिळवून देईपर्यंत पोलीसांनी रात्रंदिवस काम केलं. त्यामुळे पोलीसांची प्रतिमा जनसामान्यांच्या मनात उजळली आहे.

म्हणूनच माझ्या सहकार्‍यांच्या या कार्याचा अभिमान वाटतो असे उद्गार पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी काढले.ग्रीन वर्ल्डचे अध्यक्ष गौतम कोतवाल यांनी कोविड काळात पोलीस दलात केलेल्या कार्याचा आढावा घेणार्‍या समर्पण या चित्रफितीची निर्मिती केली आहे.या फिल्मचं रिलीज गौतम कोतवाल व डॉ. अभिनव देशमुख यांच्या हस्ते झालं.

स्पार्क ग्रुपच्या सुनिताताई पाटसकर, कमलराज ग्रुपचे संचालक मोहन थोरात, श्री साई मोतीवाले, कुमार अन्वेकर, बारामती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अविनाश लगड, इंडस्ट्रीयल पॅकर्सचे अध्यक्ष गौरव धूत इत्यादी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.

यावेळी गौतम कोतवाल बोलताना म्हणाले की, पोलीसांनी कोविड काळात केलेले कार्य अतुलनीय आहे. समाजाने त्यांच्या कार्याची दखल घेतली पाहीजे म्हणून या फिल्मची निर्मिती मी केली आहे. हि फिल्म भविष्यात अशा संकटकाळात लढताना पोलीस दलाला प्रेरणा देईल.

तसेच यावेळी कोविडच्या दोन्ही लाटेत उत्कृष्ठ कार्य केलेल्या आठ अधिकार्‍यांचा याप्रसंगी सन्मान करण्यात आला. त्यामध्ये कोरोना काळात विविध विधायक उपक्रम राबवून लाॅक डाऊनच्या नियमावलीची कडक अंमलबजावणी केल्याबद्दल खेड पोलीस स्टेशनचा गौरव करण्यात आला.त्यानुसार खेड पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सतिश गुरव यांना डॉ. अभिनव देशमुख व ग्रीन वर्ल्ड चे अध्यक्ष गौतम कोतवाल यांच्या हस्ते सन्मानपत्र देवून सन्मानित करण्यात आले. पोलीस मुख्यालयात आयोजित केलेला हा कार्यक्रम कोरोनातील जुन्या आठवणींना उजाळा देणारा आणि पुढील कार्याला प्रेरणा देणारा ठरला आहे.