मावळ(प्रतिनिधी) : मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या 28 वर्षीय तरुणाचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवार दि.28 रोजी दुपारी डोणे ( ता मावळ ) येथे घडली.किसन शशिकांत बोराडे ( वय 28, रा. डोणे, ता. मावळ, जि. पुणे ) असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे.
मयत तरुणाला मित्रांसोबत पोहताना पाण्यातील गाळाचा अंदाज न आल्याने त्याचा पाय गाळात रुतला गेला . त्यामुळे तो पाण्यात बुडाला व त्याचा मृत्यू झाला . ही घटना रविवार रोजी दुपारी दोनच्या सुमारास घडली असून याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक विलास भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन कदम हे करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार , मयत किसन बोराडे हा तरुण आपल्या ऋतिक भिलारे , विक्रम वाघमारे आदेश वाघमारे व बंटी वाघमारे या चार मित्रांसमवेत डोणे येथील तलावात पोहण्यासाठी गेला होता यावेळी त्याला पाण्यातील गाळाचा अंदाज न आल्याने त्याचा पाय गाळात रुतला गेला . त्यामुळे तो पाण्यात बुडाला व त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
या घटनेची वडगाव मावळ पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी वन्यजीव रक्षक मावळ संस्था व शिवदुर्गं मित्र संस्थेला त्याचा मृतदेह शोधण्यासाठी पाचारण केले . त्यानंतर दोन्ही टीम आवश्यक साधनसामग्रीसह तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या व शोधमोहीम सुरु केली . टीमच्या सदस्यांनी तासाभरात मृतदेह बाहेर काढला . मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
सदर मृतदेह बाहेर काढण्यासाठी वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश गराडे , विनय सावंत , भास्कर माळी , सत्यम सावंत , ओमकार कालेकर , संस्कार येवले तसेच शिवदुर्ग मित्र संस्थेचे सुनिल गायकवाड , अजय शेलार , प्रविण देशमुख , चंद्रकांत बोंबले , महेश म्हसने यांनी परिश्रम घेतले.