Thursday, May 30, 2024
Homeपुणेलोणावळापुणे ग्रामीण पोलिसांच्या स्वच्छता मोहिमेअंतर्गत आठवड्यातून एक दिवस गड किल्ले व पर्यटन...

पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्वच्छता मोहिमेअंतर्गत आठवड्यातून एक दिवस गड किल्ले व पर्यटन स्थळांची स्वच्छता..

लोणावळा (प्रतिनिधी): मावळ तालुक्यातील गड- किल्ल्यांना पर्यटक, दुर्गप्रेमी नियमित भेट देतात. मात्र दिवसेंदिवस येथे कचऱ्याचे साम्राज्य वाढत आहे. त्यासाठी पुणे ग्रामीण पोलीस पुढे सरसावले असून ग्रामीण पोलिसांकडून ‘वारसा स्वच्छतेचा, मावळा शिवरायांचा’ मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेचा प्रारंभ बुधवारी कार्ला येथील श्री एकवीरा देवी गडावरून करण्यात आला आहे.
पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्याचे वैभव असलेल्या ऐतिहासिक गड-किल्ल्यांची तसेच बौद्धकालीन लेण्यांची स्वच्छता राखण्यासाठी ग्रामीण पोलिसांनी ‘वारसा स्वच्छतेचा, मावळा शिवरायांचा’ ही मोहीम हाती घेतली असून आठवड्यातून एक दिवस गड-किल्ल्यांच्या परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी आयपीएस सत्यसाई कार्तिक यांनी दिली.
तसेच लोणावळा परिसरातील गड-किल्ले, ऐतिहासिक स्थळांच्या स्वच्छता मोहिमेत पोलीस, विद्यार्थी, सामाजिक, स्वयंसेवी संस्थाचे कार्यकर्ते, वकील, पत्रकार सहभागी झाले आहेत.या मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यात गड- किल्ले, पर्यटनस्थळांच्या परिसरात आठवड्यातून एक दिवस स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार असल्याचेही कार्तिक यांनी नमूद केले.
या मोहिमेअंतर्गत लोहगड, विसापूर, तिकोना, तुंग, राजमाची किल्ल्यासह कार्ला, भाजे लेणी, लोणावळा परिसरात पर्यटनस्थळे टायगर पॉईंट, लायन्स पॉईंट, राजमाची पॉईंट, भुशी धरण तसेच लोणावळा शहर परिसराची स्वच्छता केली जाणार आहे. ऐतिहासिक स्थळांचा वारसा जपणे तसेच संवधर्नासाठी ही मोहीम सुरू करण्यात आली असल्याचे कार्तिक यांनी सांगितले. तसेच या मोहिमेत नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन देखील त्यांनी केले.
- Advertisment -

You cannot copy content of this page