तळेगाव (प्रतिनिधी): तळेगाव दाभाडे येथील महिलेच्या 9 ऑगस्ट रोजी झालेल्या खुनाची गुन्हे शाखेने उकल केली असून त्यासंदर्भातील चार जणांना अटक केली आहे .हा खून आरोपीने लग्नाचा तगादा लावल्याने सुपारी देऊन मारेकऱ्यांकरवी केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.
बजरंग मुरलीधर तापडे ( वय 45 तळेगाव दाभाडे ) , पांडुरंग ऊर्फ सागर बन्सी हारके ( वय 35 रा . मोशी ) , सचिन प्रभाकर थिगळे ( वय 30 रा . चिखली ) सजानंद रामदास तुपकर ( वय 26 रा . चिखली ) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , तळेगाव येथे 9 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजता महिलेचा खून करण्यात आला होता . पोलिसांनी पंचनामा केला असता खून नियोजनबद्ध पद्धतीने केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले . त्यानुसार पोलिसांनी तळेगाव दाभाडे व आसपासच्या 60 ते 65 किमी परिसरात आरोपींचा तपास घेतला असता आरोपी बजरंग तापडे हा मयत महिलेला ओळखत असल्याचे समोर आले.
त्यानुसार पोलिसांनी तापडे याला अटक केली असता मयत महिला व तापडे याचे संबध असल्याने तिने आरोपीच्या मागे लग्नासाठी तगादा लावला होता . मात्र , तापडे हा विवाहित असून त्याला तीन मुले असल्याने त्याने लग्नाला नकार दिला होता . तापडे याने त्याचा जवळचा मित्र पांडुरंग हारके याला सात लाखांची सुपारी दिली.
त्यासाठी चार लाख रुपये रोख ऍडव्हान्स दिला . हारके याने त्याचा ओळखीचा गुन्हेगार मित्र सचिन प्रभाकर थिगळे याला बोलावून त्याला मृत महिलेचा फोटो दाखवला व घराची रेकी करण्यात आली . त्यानुसार मयत या स्कूटीवरून घरी येत असताना आरोपी तेथे आले व त्यानी स्कूटी आडवून तिला खाली उतरवून तिचे केस पकडून धारदार चाकूने गळा चिरून खून केला व त्यांनी पळ काढला . यातील तीन आरोपींना गुन्हे शाखेने अटक केले , तर सदानंद तुपकर याला तळेगाव पोलिसांनी अटक केले आहे . याचा पुढील तपास तळेगाव पोलीस करत आहेत.