Friday, November 22, 2024
Homeपुणेवडगावमावळ तालुका सहाय्यक निबंधकांचे निलंबन करावे मागणीसाठी तालुका भाजपची पत्रकार परिषद...

मावळ तालुका सहाय्यक निबंधकांचे निलंबन करावे मागणीसाठी तालुका भाजपची पत्रकार परिषद…

वडगाव मावळ (प्रतिनिधी) : मावळ तालुक्यातील सहाय्यक निबंधकांचे निलंबन व्हावे व त्यांच्या बेकायदेशीर निर्णयाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी अशी मागणी मावळ भाजपच्या वतीने आज वडगाव मावळ येथील भारतीय जनता पार्टी , पक्ष कार्यालयात पत्रकार परीषद घेत करण्यात आली.

या पत्रकार परिषदेत बुधवार दि .14 रोजी सायंकाळी 5 वाजे पर्यंत सहाय्यक निबंधक विठ्ठल सूर्यवंशी यांच्यावर कारवाई न झाल्यास गुरुवार दि .15 रोजी सहाय्यक निबंधक वडगाव मावळ या कार्यालयावर लोकशाही मार्गाने हजारोंच्या संख्येने मोर्चा काढून टाळाठोक आंदोलन केले जाईल , असा निर्वाळीचा इशारा तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे यांच्या वतीने देण्यात आला.

यावेळी भेगडे म्हणाले , मावळ तालुक्यात मागील काही दिवसांपासून सहाय्यक निबंधक वडगाव मावळ यांचा अनागोंदी कारभार सुरु असून अनेक वेळा तोंडी व लेखी तक्रारी करून देखील त्यांनी त्यांच्या पदाचा गैर वापर करून मागील विकास संस्था निवडणुकीवेळी बेकायदेशीर निर्णय घेतले आहेत . याबाबत आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे देखील त्यांची रीतसर तक्रार दाखल केलेली असून अद्याप पर्यंत त्यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही . तक्रार करून देखील कारवाई होत नसल्याने तालुक्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या हितासाठी भारतीय जनता पार्टी कायमच आक्रमक भूमिका घेऊन सर्व सामान्य नागरिकांना , शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचे काम करत आहे.

त्यामुळेच विठ्ठल सूर्यवंशी सहाय्यक निबंधक वडगाव मावळ यांचे निलंबन व्हावे व त्यांनी घेतलेल्या बेकायदेशीर निर्णयाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी अशी भारतीय जनता पार्टी मावळ तालुक्याच्या वतीने आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मागणी करण्यात आली.

मागील काही विकास संस्था निवडणुकीवेळी घेतलेल्या बेकायदेशीर निर्णयाची माहिती – तालुक्यातील विकास संस्थांमधील 14 हजार सभासदांचे सभासदत्व रद्द करतांना सभासदांना म्हणणे मांडण्याचा अधिकार दिला नाही, सेवा विकास संस्थांच्या निवडणुकीवेळी 1 हजार रुपये डिपॉजिट भरलेली पावती उमेदवारांना देण्यात आलेली नाही, तालुक्यातील पवना कृषक संस्था ‘ ब ‘ वर्गात असताना लेखी धमकी देऊन ‘ क ‘ वर्गात समाविष्ट करण्याचा बेकायदेशीर निर्णय घेतला.

राजकीय दबावापोटी व शिफारस पत्रानुसार राष्ट्रवादीच्या 3 कार्यकर्त्यांची प्रशासक म्हणून नेमणूक केली नेमणूक करत असताना संस्था चेअरमन व संचालक मंडळास कोणतीही पूर्व कल्पना न देता राष्ट्रवादीच्या 3 कार्यकर्त्यांची पवना कृषक संस्थेचे प्रशासक म्हणून नेमणुकीचा बेकायदेशीर आदेश पारित केला,पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत भाजपाच्या ताब्यातील संस्था प्रतिनिधींना निवडणूक लढता येऊ नये म्हणून संस्था ऑडिटरला धमकावून लेखापरीक्षण वर्ग ‘ ब ‘ ऐवजी ‘ क ‘ करण्याचा अधिकार सहाय्यक निबंधक याना नसताना देखील त्यांनी बेकायदेशीर निर्णय घेऊन व वर्गातील संस्था क वर्गात समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला,कोथुर्णे सोसायटी मध्ये ऐन निवडणुकीच्या वेळी 92 सभासदांना बोगस सभासदत्व देऊन त्यांना मतदानाचा अधिकार दिला.

कोथुर्णे सोसायटी मध्ये सभासद असलेल्या 56 सभासदांना पूर्व कल्पना न देता त्यांचे म्हणणे ऐकून न घेता पहिल्याच सुनावणीत सभासदत्व रद्द करण्याचा बेकायदेशीर निर्णय घेतला,कोथुर्णे सेवा सोसायटी निवडणुकीच्या पूर्वी अंतिम मतदार यादी सादर करत असताना त्यावर सेवा सोसायटी चेअरमन व सचिव या दोघांच्या हि सह्या होणे अपेक्षित असताना सोसायटी चेअरमन याना विश्वासात न घेता केवळ संस्था सचिव यांच्या सहीने मतदार यादी दाखल करून निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली, शिवली विकास सोसायटीच्या विजयी उमेदवारांना अपात्र करण्याचा अधिकार सहाय्यक निबंधक ज्याना नसताना देखील त्यांनी बेकायदेशीर निर्णय घेऊन 5 विजयी उमेदवारांना अपात्र घोषित केले.

विकास सोसायटी निवडणुकीनंतर 30 दिवसांच्या आत चेअरमन व व्हा . चेअरमन यांची निवड होणे अपेक्षित असताना दोन वेळेस चेअरमन व व्हा . चेअरमन निवडीचा कार्यक्रम जाहीर करून निवडीच्या दिवशी संचालकांचे राजीनामे स्वीकारून निवडणूक कार्यक्रम बेकायदेशीर निर्णय घेऊन रद्द केला, शिळिंब विकास सोसायटी निवडणुकीत अंतिम मतदार यादीवर आक्षेप घेतलेला असून देखील मतदारांची नावे कायम ठेऊन भाजप च्या विचारांची 60 नावे बेकायदेशीर निर्णय घेऊन रद्द केली.

शिळिंब विकास सोसायटी निवडणुकीतील उमेदवारांच्या बोगस सह्या करून उमेदवारी अर्ज बेकायदेशीरपणे मागे घेण्याचा निर्णय घेतला,विठ्ठल सूर्यवंशी हे रायगड जिल्ह्यातील अलिबाग या ठिकाणी कार्यरत असतांना केलेल्या बेकायदेशीर चुकीच्या कामाविरोधात स्थानिक लोकप्रतिनिधी व विविध सेवा सहकारी संस्थांनी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने विठ्ठल सूर्यवंशी यांची विभागीय चौकशी सुरु असून ती देखील लवकरात लवकर पूर्ण व्हावी, मावळ तालुक्यात जवळपास 111 गृह निर्माण संस्था असून त्यावर प्रशासक नेमून त्यांना बेकायदेशीरपणे नियमांपेक्षा जास्त मानधन देऊन गृह निर्माण संस्थांची आर्थिक लूट केल्याप्रकरणी गृह निर्माण संस्थांनी सहकार आयुक्त , विभागीय सह निबंधक , जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था पुणे यांच्याकडे तक्रार केलेली असून त्यानुषंगाने विठ्ठल सूर्यवंशी सहाय्यक निबंधक वडगाव मावळ यांची चौकशी झालेली असून देखील अद्याप पर्यंत चौकशीच्या अनुषंगाने काहीही कारवाई झालेली नाही ती देखील त्वरित करावी अशी आपल्या माध्यमातून सहकार आयुक्त पुणे यांना विनंती करतो.

- Advertisment -

You cannot copy content of this page