मावळ (प्रतिनिधी):मावळ तालुक्यातील महिलांच्या शासकीय समस्यांबाबत आज मावळ तालुका महिला आघाडी अध्यक्षा सायली जितेंद्र बोत्रे आणि भाजपा महिला पदाधिकारी व महिला कार्यकर्त्यांच्या वतीने तहसीलदार विक्रम देशमुख यांना निवेदन देण्यात आले.
मावळ तालुक्यातील अनेक महिलांना रेशनिंग मिळत नाही, याबाबत अनेक वेळा पुरवठा अधिकाऱ्याशी संपर्क केला असता उडवा उडवीची उत्तरे महिलांना मिळत असतात,तर कधी कधी पुरवठा अधिकाऱ्याच्या कार्यालयाशी संपर्क केला असता अधिकारी कार्यालयात नसतात मग अशाने नागरिकांचे प्रश्न कसे सुटतील,महिलांना वारंवार वडगावच्या फेऱ्या माराव्या लागणार नाहीत.याची अधिकाऱ्यांनी काळजी घ्यावी , तसेच अनेक दिवसांपासून संजय गांधी निराधार योजनेची अनेक पेन्शन धारकांची पेन्शन थांबली असून ती त्वरित चालू करावी,काही शासकीय अडचणी असतील तर त्या पूर्ण करून निराधार तसेच विधवा महिलांना न्याय मिळवून द्यावा ,अशा प्रकारची विनंती मावळचे नवनिर्वाचित तहसीलदार विक्रम देशमुख यांना निवेदनामार्फत करण्यात आली.
यावेळी मावळ तालुका भाजपा महिला आघाडी अध्यक्षा सायली बोत्रे,तालुका महिला सरचिटणीस अनिता सावले , नाणे मावळ महिला आघाडी अध्यक्षा सीमा आहेर तसेच अनेक गावच्या महिला मोठ्या संख्येने तहसील कार्यालयात उपस्थित होत्या.