
मावळ (प्रतिनिधी): मोरया महिला प्रतिष्ठान वडगांव मावळ आयोजित हळदी कुंकू समारंभास वडगाव शहरातील महिला भगिणींचा “न भूतो न भविष्यती”असा उदंड प्रतिसाद लाभला.
हिंदु संस्कृतीमधील स्त्रियांचा सर्वात आवडता सण म्हणजे हळदी कुंकू जुनी नाती दृढ करायची व नवी नाती निर्माण करायची या व्यापक हेतूने हळदी कुंकवाचं सौभाग्य लेणं हा कार्यक्रम वडगांव येथे मोठ्या उत्साहात पार पडला.
राष्ट्रमाता जिजाऊ आणि साक्षरतेच्या जनक सावित्रीबाई फुले यांना वंदन करत दीप प्रज्वलन करून मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
मोरया महिला प्रतिष्ठान आयोजित “साक्षरतेचे वाण” या हळदी कुंकू समारंभाला उदंड प्रतिसाद देत वडगाव शहरातील सुमारे 1600 ते 1700 महिला भगिनींनी आपली उपस्थिती नोंदवली. रांगोळीच्या सुबक नक्षीत व वाद्यांच्या मंजुळ स्वरात मोरया महिला प्रतिष्ठान अध्यक्षा अबोली ढोरे आणि सर्व संचलिका यांनी महिला भगिनींना हळदीकुंकू लावून व तिळगुळ वाटून सर्व सौभाग्यवती महिलांचे स्वागत केले.
यावेळी कुलस्वामिनी महिला मंचच्या अध्यक्षा सारिका शेळके, आशा वायकर, डाॅ. मनीषा निकम, नगरसेविका संगीता शेळके, पूनम जाधव, शारदा ढोरे, माया चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
सौ. सारिका शेळके यांनी महिलांच्या विविध समस्या बाबत संवाद साधत महिलांनी नवीन उद्योग व्यवसाय चालू करण्यासाठी पुढे यावे असे आवाहन केले. तसेच मोरया महिला प्रतिष्ठान अध्यक्षा अबोली ढोरे यांनी वडगाव शहरातील महिला भगिनींसाठी हाताला काम म्हणून येत्या फेब्रुवारी महिन्यापासून मोठ्या प्रमाणावर उद्योग व्यवसाय सुरू करण्यात येणार असल्याची माहिती उपस्थित महिला भगिनींना दिली.