Sunday, June 23, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडहालीवली गावात आगळी वेगळी शिवजयंती साजरी !

हालीवली गावात आगळी वेगळी शिवजयंती साजरी !

सरपंच सौ.प्रमिला सुरेश बोराडे यांचा पुढाकार..

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) कर्जत तालुक्यातील हालीवली गावाला ” आदर्श गाव ” म्हणून ओळख आहे , या गावात महाराष्ट्राचे आराध्य दैवत , कुळवाडीभूषण छत्रपती शिवाजी महाराज यांची १९ फेब्रुवारी २०२३ शासकीय आदेशानुसार शिवजयंती आगळी – वेगळी व उत्साहात येथील ग्रामपंचायत सरपंच सौ.प्रमिला सुरेश बोराडे यांच्या पुढाकाराने व सर्व ग्रामस्थ – महिला वर्गांच्या सहकार्याने साजरी करण्यात आली.यावेळी हालीवली गावच्या सरपंच सौ.प्रमिला बोराडे यांच्या शुभहस्ते ग्रामपंचायत कार्यालयात शिवप्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पुजन करण्यात आले . प्राथमिक शाळा हालीवली येथून शिवरायांची सुशोभित केलेल्या पालखीची गावातील चौकाचौकामधून भव्य मिरवणुक काढण्यात आली . शिवरायांच्या स्मारकाचे पुजा करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांनी लेझीम नृत्य सादर करून सर्वांची मने जिंकली , तसेच शिवगर्जना आणि शिवराय , जिजाऊ , शंभुराजांचा जयजयकार करत , ” हरहर महादेव ” अशा ललकारींनी सर्व परीसर मंत्रमुग्ध झाला होता . यावेळी सरपंच सौ.प्रमिला बोराडे यांनी तसेच इतर महिला, तरूणांनी पालखीला खांदा देऊन पालखी गावात फिरवली . जागोजागी सुवासिनींनी पंचारतीने पालखीचे तसेच शिवप्रतिमेचे पुजा केले . ग्रामस्थांनी मुलांना पाणी व खाऊचे वाटप केले . गावाच्या बाजूला वसलेल्या सिग्नेचर डीझायर या नविन वसाहतीमध्ये राहणाऱ्या ग्रामस्थांनी देखील पालखीचे मोठ्या उत्साहाने स्वागत केले.तिथे देखील विद्यार्थ्यांनी लेझीम नृत्य सादर केले .तिथून वळसा घालून पालखी सुयोग सोसायटीमधून पुन्हा शाळेत आणली . शाळेत सरपंच सौ. प्रमिला बोराडे यांच्या हस्ते जिजाऊ , शिवराय व शंभूराजांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले , तसेच ग्रामस्थांनी देखील पुजन केले . विदयार्थीनी , ग्रामस्थांनी गीत , पोवाडे , गर्जना , भाषणे करून शिवस्मरण केले . मुलांना नाश्ता तसेच पाणी वाटप करण्यात आले.
यावेळी सरपंच सौ.प्रमिला सुरेश बोराडे यांनी छत्रपतींवर बोलताना ” भगवा आमुचा झेंडा , भगवे आमुचे रक्त , प्राण देऊनी राखी तो आम्ही स्वराज्याचे तख्त , आम्ही फक्त आणि फक्त शिवरायांचेच भक्त ” , यावर प्रकाश टाकत त्या पुढे म्हणाल्या की , शिवचरित्र हे साखरेच्या पेढयासारखे आहे , पेढा कसाहि खाल्ला तरी गोडच लागतो तसेच शिवचरीत्र कुठुन हि अभ्यासले तरी ते प्रेरणा देणारच .भक्ती आणि शक्तीचा मेळ आपणास शिवचरित्रात पहायला मिळतो. सदगुण – सदाचार – पराक्रम आणि सामर्थ्य यांचा सुरेख संगम शिवचरित्रात पहावयास मिळतो. आमचे शिवप्रेम हे तात्पुरते उसने घेतले नाही तर ते आमच्या रक्तातच पेरलेले आहे.म्हणूनच लहानपणापासुन शिवविचारांची आवड आम्ही जोपासली व बी.ए.ला एम.ए.ला इतिहास हा विषय घेतला आणि बी.एड.ला देखील इतिहास हाच विषय घेतला.
शिवविचार लढण्याची ताकद देतात , परिस्थिती कशी हि असु दे , किती हि मोठे संकट असो त्यातुन मार्ग काढण्याची ताकद या विचारांमध्ये आहे . डोंगराएवढे संकट हि छोटे वाटून जाते , आणि म्हणुनच आज मी समर्थपणे उभी आहे फक्त आणि फक्त शिवभक्त आहे म्हणुन , असे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले .आमच्या नसानसात , श्वासात फक्त शिवविचार भिनलेला आहे , ज्यांना लढायचे असेल , यशस्वी व्हायचे असेल , जिंकायचे असेल त्यांनी शिवविचारांचा अभ्यास करावा आणि नियत साफ ठेवावी.संयमाची शिकवण जिजाऊ देतात तर मॄत्युलाहि जिंकण्याची ताकद शंभुराजांकडुन मिळते. सरपंच सौ.प्रमिला बोराडे यांच्या मार्गदर्शनाने तलवारीच्या पात्याप्रमाणे प्रत्येक शब्द चमकत होता , आणि उपस्थितांना प्रेरणा देत होता.या कार्यक्रमासाठी सरपंच सौ.प्रमिला सुरेश बोराडे , उपसरपंच , ग्रामसेवक , सदस्य , कर्मचारी , मोठ्या प्रमाणात शालेय विद्यार्थ्यांचे पालक , गावातील महिला वर्ग , ग्रामस्थ , शिक्षक , विद्यार्थी , तरूणवर्ग यांनी उपस्थिती दाखवून संपूर्ण कार्यक्रमाची शोभा वाढविली.
- Advertisment -

You cannot copy content of this page