Friday, November 22, 2024
Homeपुणेपिंपरी चिंचवडअसा रचला होता आदित्य ओगलेच्या अपहरण व खुनाचा कट, पहा सविस्तर...

असा रचला होता आदित्य ओगलेच्या अपहरण व खुनाचा कट, पहा सविस्तर…

पिंपरी(प्रतिनिधी) : चिमुकल्या आदित्य ओगले याच्या खूनाचा तपास करत असताना त्याच्याच बिल्डींगमध्ये राहणाऱ्या मंथन भोसले या इंजिनीयर तरूणाने मागील 15 दिवसापासूनच अपहरण व खुनाचा कट रचल्याचे समोर आले आहे. त्यासाठी मंथन याने त्याची कुशलता पणाला लावली होती . अगदी सुरुवातीला पोलिसांना सहकार्य करण्याचे नाटकही त्याने केले , मात्र सत्य कधी लपत नाही म्हणतात त्या प्रमाणे मंथन याचे पितळ अखेर उघडे पडले .

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , आदित्य याचे अपहरण करण्याचे मंथन याने 15 दिवसांपासून ठरवले होते . यासाठी त्याने त्याचा शाळेतला मित्र अनिकेत समदर यालाही बोलावून घेतले . समदर भोसलेच्या मदतीला धावून येण्याचे कारणही तसेच होते . मंथन हा बारावी झालेला असला तरी अनिकेत मात्र बारावीच शिकला होता . त्याने एका नेपाळी मुलीशी लग्न केले व मुंबईला स्थलांतरीत झाला . मात्र , लग्नानंतर त्याला पैशांची गरज भासत होतीच . याच गरजेला मंथनने पैशांचे आमिष दाखवले . म्हणजे ओगले कुटुंबीयावरचा रागही निघेल आणि पैसेही मिळतील .

यासाठी त्याने मागील पंधरा दिवसांपासून कट रचन्यास सुरुवात केली . वडिलांची कार घेतली . तिच्या काचांना काळ्या फिती लावल्या , मित्रही तोपर्यंत पिंपरीत आला होता . सोसायटीमध्ये सीसीटीव्ही नाहीत असा पार्किंगचा कोपरा हेरून ठेवला . आता वेळ होती आदित्यचे अपहरण करण्याची ! त्यासाठी दोन वेळा प्रयत्नही केले , मात्र ते फसले . मग अजून थोडा अभ्यास केला असता आदित्य याची आत्या त्या बिल्डींगमध्ये रहाते व तिचा आदित्यवर विशेष लळा होता हे मंथनला माहिती झाले . याचाच फायदा घेऊन गुरुवारी आदित्य खाली खेळायला येताच अनिकेत याने आदित्यला आत्याने बोलावले आहे , म्हणून सोबत गाडीजवळ नेले . गाडीत बळजबरी बसवताना आदित्यने आरडाओरड करण्यास सुरुवात केली . यावेळी मंथन याने रागाने आदित्यचे तोंड दाबले व एका हाताने त्याचा गळाही दाबला.यात आदित्यचा मृत्यू झाला .

मंथन व त्याचा मित्र यांना गांजा सिगारेट याचे व्यसन असल्याचे तपासात समोर आले . यासाठी तो व त्याचे मित्र एमआयडीसी भोसरी येथे बंद पडलेल्या कंपनीच्या आवारात व्यसन करण्यासाठी जात होते . त्याच बिल्डींगच्या छतावर आदित्यचा मृतदेह गोणीत भरून फेकून देण्यात आला . दरम्यान , पोलिसांपर्यंत गोष्ट गेली असता पोलीस सोसायटीमध्ये चौकशीसाठी आले . तोपर्यंत मंथन मृतदेहाची विल्हेवाट लावून बिल्डींगमध्ये परत आला होता . यावेळी पोलिस चौकशी करत असताना तो त्यांच्या आसपास फिरकत सहकार्य करण्याचे नाटक करत होता . पोलिसांची उशिरापर्यंत तपासणी सुरु असताना तो तेथून चिखली येथे एका मोबाईलच्या दुकानात गेला.

तिथे एक कामगार त्याचा मोबाईल घेऊन आला होता . यावेळी त्याने त्याचे चलाख डोके वापरून त्या कामगाराला माझा माबाईल हँग झाला आहे , मला थोडं मोबाईलचे काम आहे सांगून मोबाईल घेतला . त्या कामगाराच्या फोनवरून त्याने आदित्यच्या बाबाला रात्री एक वाजता 20 कोटींची खंडणी मागितली . या एसएमएसने पोलिसांची तपासाची दिशाच फिरली . तरी पोलिसांचे एक पथक सोसायटीतील सर्वांची कसून चौकशी करत होते . माहिती घेत होते.यावेळी मंथनच्या वडिलांनी पोलिसांना माहिती देताना मंथन व ओगले कुटुंबीयांचे काही महिन्यांपूर्वी जोरदार भांडण झाले होते.

तो सोसायटीत सर्वांना थोडा त्रास देत होता यासाठी त्याला सहा महिन्यांसाठी मामाच्या गावाला सोडल्याचेही त्यानी सांगितले . मात्र , त्यानंतर प्रकरण मिटले असे सर्वांना वाटले होते . याचाच आधार घेऊन पोलिसांनी मंथनकडे चौकशी करण्यास सुरुवात केली . मात्र , त्याची उत्तरे काही विसंगत वाटत असल्याने पोलिसांनी त्याला पोलीसी खाक्या दाखवताच त्याने गुन्हा केल्याचे कबुल केले . ओगले यांच्यावरील राग तसेच 20 कोटी मागितले , तर किमान तीन ते चार लाख तरी मिळतील म्हणून हा कट रचल्याचे त्याने कबुल केले.मात्र , या घटनेने केवळ ओगले कुटुंब नाही तर मंथनचे भोसले कुटुंब व पूर्ण सोसायटी हादरली आहे.

- Advertisment -

You cannot copy content of this page